आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस समारंभातून उंचावणार पोलिसांचे मनोबल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कामाचा वाढता ताण सततच्या बंदोबस्तामुळे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना जडणारे शारीरिक-मानसिक आजार, स्वत:सह कुटुंबालाही देता येणारा वेळ या गाेष्टी लक्षात घेऊन त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उपक्रमाची सुरुवात पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी आपला वाढदिवस पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत साजरा करून केली.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना ताणतणावामुळे शारीरिक आणि मानसिक आजार जडत आहेत. हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे अाजार जडत आहेत. दोन-तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनांची पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांनी गंभीर दखल घेत पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीपोलिस ठाण्यात नियमित आरोग्य शिबिर घेण्याचे तसेच त्यांना विरंगुळा मिळण्यासाठी किरकोळ रजा तत्काळ मंजूर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना आपले वाढदिवस साजरा करण्यास वेळ मिळत नाही. प्रत्येक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात पोलिस आयुक्तांनी स्वत:चा वाढदिवस पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत साजरा करून केली. सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांचा वाढदिवस बंदोबस्त नियोजनात साजरा करण्यात आला. इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस कार्यरत असलेल्या ठिकाणी साजरा करण्याचे आदेश दिले. वाढदिवसाच्या दिवशी कुटुंबीयांना वेळ द्यावा या दृष्टिकोनातून किरकोळ रजा देण्याचा मानस असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
आरोग्य सुधारण्यासाठी उपक्रमाचे अायाेजन
पोलिस कर्मचारी प्रशासनाचा कणा आहेत. व्यस्त कामांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांना वेळ देता येत नाही. शारीरिक, मानसिक आजार जडत आहेत. कामापासून काही काळ विश्रांती मिळण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांचे वाढदिवस नियमित साजरे करण्यात येणार आहेत. पोलिसांना मनमोकळे करण्यासाठी गेट टुगेदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार अाहे. - डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त
छायाचित्र: पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंघल यांनी स्वत:च्या वाढदिवसापासूनच नव्या उपक्रमाला प्रारंभ केला. त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा प्रदान करताना सहायक पाेलिस अायुक्त.
बातम्या आणखी आहेत...