आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट: बीवायके कॉलेजात कडक सुरक्षाव्यवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बीवायके महाविद्यालयात दोन दिवस झालेल्या विद्यार्थ्यांमधील वादानंतर तिसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. १४ ) कडक बंदोबस्तात महाविद्यालयामध्ये पुढील कार्यक्रम पार पडले. महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवून एकाच प्रवेशद्वाराने विद्यार्थ्यांना स्वत: प्राचार्य ओळखपत्र तपासून मध्ये सोडत होते.
बीवायके महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत विविध गटांमध्ये चकमकी झाल्या. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेरील मुलांना बोलावल्याने हाणामारीपर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर असे प्रकार थांबावेत, यासाठी महाविद्यालयामध्ये सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली. महाविद्यालयाच्या मागील प्रवेशद्वारावर स्वत: प्राचार्य विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासत होते. इतर कोणत्याही रस्त्याने महाविद्यालयात प्रवेश दिला जात नव्हता. शिवाय, पोलिसांचीही गस्त महाविद्यालयात दिसत होती. पोलिस येताच घोळक्याने फिरणारे विद्यार्थी विखुरले जात. विद्यार्थ्यांना प्रांगणात वावरण्याची मोकळीक मिळावी, मात्र इतर व्यक्तींमुळे सेलिब्रेशनच्या मूडला गालबोट लागू नये, अशी अपेक्षा असते. झालेल्या प्रकारातील वादाची ठिणगी वेळीच केलेल्या मध्यस्थीने विझली खरी, पण हीच दक्षता महाविद्यालयात पूर्वी घेतली असती तर वादही उद्भवले नसते. मात्र, उशिरा का होईना झालेल्या सुधारणांचे स्वागत करण्यात येत आहे.
वचक हवा
महाविद्यालयातबाहेरील विद्यार्थ्यांचा वावर असतो, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्रास देणे, धमकावणे असे प्रकार घडतात. यावर वचक राहण्यासाठी पोलिसांची गस्त ओळखपत्रांची तपासणी नियमित ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी सभेने केली आहे.
छायाचित्र: बीवायके महाविद्यालयात गुरुवारी प्राचार्य कलाल यांनी वार्षिक महोत्सवासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासले.