आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर, वार्डबॉयचे रूप घेऊन टिप्परच्या खंडणीखाेरास अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एखाद्या सिनेमाच्या कथेेप्रमाणे पोलिसांनी डॉक्टर, वार्डबॉइजचे रूप घेत दवाखाना चालवू देण्यासाठी दर महिन्याला पंधरा हजारांची खंडणी मागणाऱ्या टिप्पर गँगच्या सराईत गुन्हेगाराला पैसे घेतानाच अटक केली. शुक्रवारी (दि. ११) दुपारी खुटवडनगर भागातील एका हॉस्पिटलमध्ये अंबड पाेलिस आणि सायबर क्राइमच्या पथकाने व्हाॅटसअॅप ग्रुपद्वार संदेशाची देवाण-घेवाण करीत ‘अलर्ट’ हे धडाकेबाज ऑपरेशन यशस्वी केले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, मयूर हाॅस्पिटलचे डॉ. विनोद वाणी यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार टिप्पर गँगच्या एका गुंडाने फोनद्वारे ‘हॉस्पिटल चालवायचे असल्यास दर महिन्याला पंधरा हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल, शुक्रवारी पैसे घेण्यासाठी येईन’, अशी धमकी दिली. वाणी यांनी तत्काळ आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांना माहिती दिली. आयुक्तांनी सायबर क्राइमच्या पथकाला सूचना देत एक पथक तयार केले. या पथकाने हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अाणि वार्डबॉइजचे वेशांतर करून सापळा रचला. एकसंशयित ठरलेल्या वेळेप्रमाणे अाला अाणि डॉ. वाणी यांच्याशी तडजोड करत पाच हजारांची खंडणी घेताना त्याला पथकाने प्रत्यक्ष पकडले.

चौकशीमध्ये त्याने आसिफ मेहबूब शेख (रा. सिडको) असे नाव सांगितले. वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार, मधुकर कड, रवींद्र साळुंके, उपनिरीक्षक तुषार चव्हाण, प्रदीप ठाकरे, सागर निकुंभ, सचिन आजबे, विलास कुटे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. डॉक्टरचे वेशांतर करणारे उपनिरीक्षक चव्हाण अाणि वॉर्डबॉइज झालेल्या कर्मचाऱ्यांचे आयुक्त डॉ. सिंघल यांनी विशेष अभिनंदन केले.

खंडणी मागणाऱ्यांची गय केली जाणार नाही
^खंडणीची मागणी होत असल्यास तत्काळ पाेलिसांशी संपर्क साधा. खंडणी मागणाऱ्यांची गय केली जाणार नाही. व्हाॅट‌्सअॅप नंबरवर अथवा थेट संपर्क साधून तक्रार करा. शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. -डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त

‘अलर्ट ग्रुप’च्या अाधारे कारवाई
निरीक्षक अनिल पवार यांनी या कारवाईसाठी ‘अलर्ट’ व्हाॅट‌्सअॅप ग्रुप तयार केला होता. ग्रुपवर कारवाईमधील पथकाव्यतिरिक्त केवळ अायुक्त होते. आयुक्त ‘क्राइम मीटिंग’मध्ये व्यस्त असताना ग्रुपवर पथकाशी संवाद साधून कारवाईबाबत सूचना देत होते, हे विशेष.
बातम्या आणखी आहेत...