आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्पर गँगच्या चार कुख्यात गुंडांना इतर कारागृहात हलविले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माेक्कान्वये कारवाई करण्यात अालेल्या टिप्पर गँगचा म्हाेरक्या समीर पठाणसह चार कुख्यात गुंडांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात हलविण्यात अाले अाहे. टिप्पर गँगची सूत्रे कारागृहातून हलवली जात असल्याचा संशय पोलिसांना असल्याने कारागृह महानिरीक्षक आणि अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी ही कारवाई केली. शहरातील गुन्हेगारीला अाळा बसावा, या दृष्टीने पोलिस प्रशासनाची ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे इतर गुंडांच्या गँगच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
शहरात खूनसत्र रोखण्यास पोलिसांना काही प्रमाणात यश येत असताना टिप्पर गँगचा सक्रिय तडीपार गुंड अजिंक्य चव्हाण याचा गोळ्या घालून खून झाला. पंचवटीत प्रेमप्रकरणातील वादातून राहुल टाक या युवकावर गोळीबार झाला. एका व्यावसायिकावर गोळीबार करत दोन दिवसांत मोठा धमाका करण्याची धमकीही देण्यात अाली. पोलिसांकडून व्यापक स्वरूपात कारवाई होत असूनही गुन्हे आटोक्यात येत नसल्याने पोलिस आयुक्तांनी ‘भाई’च्या समर्थकांसह अर्थसाह्य करणाऱ्यांची गोपनीय माहिती घेतली. कारागृहातील ‘भाई’च्या इशाऱ्यावरच शहरात गुन्हे घडवले जात असल्याची खात्री पटल्यानंतर कुख्यात टिप्पर गँगच्या चार सदस्यांना इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. समीर पठाण येरवडा, नितीन काळे, तळोजा, नवी मुंबई, नागेश सोनवणे धुळे आणि सुनील अनार्थे याची औरंगाबाद कारागृहात रवानगी करण्यात आली.

कारागृहातील‘भाईं’वर जरब : कारागृहातील‘भाईं’वर या कारवाईमुळे जरब बसली आहे. या ‘भाईं’ना सहकार्य करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार असल्याने ‘भाईं’चा दानापाणी बंद झाला आहे. राज्यातील इतर कारागृहात हलविण्याच्या कारवाईच्या भीतीने हे ‘भाई’ दहशतीमध्ये आहेत.

बंदोबस्तात हलवले : कुख्यातटिप्पर गँगच्या सदस्यांना हातात पायात बेड्या घालून पोलिस उपनिरीक्षक आणि १६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकाने येरवडा, तळोजा, धुळे आणि औरंगाबाद कारगृहात सोडले. संशयितांना हलवत असतांना इतर भाईंच्या चेहऱ्यावर भीती दिसत हाेती.

टिप्पर गँगची दहशत
टिप्परचा म्हाेरक्या समीर उर्फ छोटा पठाण अन्य सदस्यांनी जिल्हा रुग्णालयात एका सहायक उपनिरीक्षकावर हल्ला करून त्याच्या कानाला चावा घेतला हाेता. न्यायालयात उपनिरीक्षक सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला, प्रिझन वॉर्डमध्ये असलेल्या प्रतिस्पर्धी गँगच्या सदस्यावर हल्ला रोखणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न या गँगने केला होता. कारागृहातही या गँगची दहशत होती. दोन दिवसांपूर्वीच संशयितांना अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी संशयितांची रवानगी कैदी पार्टीच्या पथकाने इतरत्र केली.
बातम्या आणखी आहेत...