आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रोप वे’ द्वारे 25 रूपयांत गोदेच्या उगमस्थानाचे करा दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गोदावरीचे उगमस्थान बघण्यासाठी 700 पाय-या चढण्याची कसरत आता थांबणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने बीओटी तत्वावर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मा सावित्री मंदिर ते गंगाद्वार अशा रोप-वेच्या प्रस्तावासाठी निविदा काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा रोप-वे झाला तर 25 ते 50 रूपयात गंगाद्वारापर्यंत पोहचता येईल.
त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर गोदावरीचे उगमस्थान असलेल्या गंगाद्वारालाही भाविक आर्वजून भेट देतात. ब्रह्मगिरीच्या रस्त्यातील गंगाद्वारापर्यंत पोहचण्यासाठी 700 पाय-या चढण्याची कसरत करावी लागते. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना इच्छा असूनही ब-याचवेळा येथे भेट देणे शक्य होत नाही. रोप- वेसाठी पहिल्या टप्प्यात 8 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र सुधारित अंदाजपत्रकानुसार त्यात वाढ होणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे.
असे आहे गंगाद्वार
गंगाद्वार म्हणजे दक्षिणेची गंगा असलेल्या गोदावरीचे मंदिर आहे. येथूनच गोदावरी नदीचा उगम झाला आहे. येथे गोदावरी मातेची मूर्ती असून तिच्या पायाशी असलेल्या गोमुखाच्या आकारातील दगडातून थेंब थेंब पाणी झिरपते. येथेच गोरक्षनाथ गुंफा, 108 शिवलिंग तसेच प्रभू रामचंद्रांसह सीतामाता व लक्ष्मण तीर्थही आहेत.
24 केबिन उभारणार
ब्रह्मा सावित्री मंदिरापासून ते गंगाद्वार असा तिरकस पद्धतीने जमिनीकडून डोंगराकडे रोप-वे तयार केला जाईल. साधारण एका तासात 550 प्रवाशांची वाहतूक करता येईल. त्यासाठी 24 केबिन तयार केल्या जाणार असून यातील एका केबिनमध्ये 4 याप्रमाणे 96 प्रवाशांची एकावेळी वाहतूक होणार आहे. प्राथमिक सर्वेक्षणाप्रमाणे 10 हजार भाविकांपैकी 2 हजार भाविक हे गंगाद्वाराचे दर्शन घेतात. रोप वेसाठी अंदाजे 50 रूपये प्रौढांसाठी तर ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यासाठी 25 रूपयांची आकारणी होणार आहे. यात्रा कालावधी तसेच गर्दीच्या काळात 12 तास तर अन्य कालावधीत 8 तास रोप-वे सुरू राहणार आहे.