आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज होणार म‍हापालिकेच्या स्‍थायी समितीच्‍या सदस्‍यांची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सर्वार्थाने महत्त्वपूर्ण ठरणार्‍या स्थायी समितीवर निवडीसाठी सर्वच पक्षांमध्ये जबरदस्त चुरस असून, गुरुवारी सकाळी 11.30 वाजता महापौर अँड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या सभेत ही निवड होईल. या समितीवर वर्णी लागण्यासाठी अनेक नगरसेवकांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करत मोर्चेबांधणी केली आहे.

एक वर्षाचा काळ पूर्ण झाल्याने समितीच्या आठ सदस्यांना चिठ्ठी पद्धतीने बाद ठरवण्यात आले. त्यामुळे गुलजार कोकणी, हेमंत गोडसे, सुवर्णा मटाले, डॉ. विशाल घोलप (मनसे), विक्रांत मते, वैशाली दाणी, सुफियान जीन (राष्ट्रवादी कॉँग्रेस) व उद्धव निमसे (कॉँग्रेस) यांना निवृत्त व्हावे लागले. उर्वरित आठपैकी काही सदस्यांनी राजीनामे देऊन इतर नगरसेवकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी शिवसेना, कॉँग्रेस व अपक्ष गटाकडून करण्यात आली. त्यानुसार शिवसेनेचे अजय बोरस्ते, कॉँग्रेसचे दिनकर पाटील आणि अपक्ष गटाचे दामोदर मानकर यांनी महापौरांकडे राजीनामे सुपूर्द केले, तर मनसेचे अशोक मुर्तडक, भाजपचे बाळासाहेब सानप व सीमा हिरे, रिपाइंचे प्रकाश लोंढे, शिवसेनेचे सूर्यकांत लवटे हे समितीवर कायम आहेत. त्यामुळे एकूण 11 सदस्यांची निवडणूक होत आहे. स्थायीवर वर्णी लागण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली. बुधवारी धूलिवंदनाच्या मुहूर्तावरही अनेकांनी पक्षर्शेष्ठींची भेट घेत समितीवर नियुक्तीचा आग्रह धरला.

संभाव्य उमेदवारांची चर्चा
अपक्ष गटाकडून संजय चव्हाण, शिवसेनेचे शैलेश ढगे, कोमल मेहरोलिया, कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे व अश्विनी बोरस्ते, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सुनीता निमसे, हरिश्चंद्र भडांगे यांची निवड होणे शक्य असल्याची चर्चा बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. गुरुवारी सकाळी सदस्य निवडीसाठी होणार्‍या सभेपूर्वी अपक्ष, मनसे व दोन्ही कॉँग्रेसच्या सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान बैठका होऊन अंतिम नावे ठरवली जाणार आहेत.


अशी आहे सद्यस्थिती
स्थायी समितीवर एकूण 16 सदस्य निवडून जातात. त्यात संख्याबळानुसार पक्षनिहाय सदस्यांची निवड केली जाते. सध्या या समितीत मनसे- 5, राष्ट्रवादी काँग्रेस- 3, काँग्रेस- 2, भाजप- 2, शिवसेना- 2, अपक्ष- 1 व रिपाइं- 1 अशी स्थिती आहे.