आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विघ्नहर्त्या लाडक्या श्री गणरायाचे आज वाजतगाजत घराेघरी अागमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विघ्नहर्ता,सुखकर्ता, बुद्धी देवता, सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन गणेश चतुर्थीला सोमवारी (दि. ५) होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेशमूर्तींसह सजावटीचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत रविवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती.

वर्षभरापासून अाबालवृद्धांसह सर्वच गणरायाची वाट पाहत असतात. या गणरायाच्या आगमनासाठी शहरातील सर्वच छोट्या-मोठ्या मंडळांसह घरोघरी तयारी करण्यात आली आहे. गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी विविध गणेश मंडळांतर्फे ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबरोबरच घरोघरीही बाप्पाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. शहरातील ईदगाह मैदान, मेनरोड, कॉलेजरोड, द्वारका, नासर्डी पूल, सिडको, सातपूर परिसरात श्रींची मूर्ती घेण्यासाठी नागरिकांनी रविवारी सकाळपासून गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. नागरिकांची ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. यंदा नागरिकांकडून शाडू मातीच्या गणेशमूर्ती घेण्यास अधिक पसंती दिली जात होती.
यंदा शाडूच्या गणेशमूर्तीचा अधिक बाेलबाला
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांकडून यंदा शाडू मातीच्या मूर्ती खरेदीला अधिक प्राधान्य दिले जात हाेते. शाडू मातीच्या अनेक आकर्षक मूर्ती शहर परिसरात सहज उपलब्ध होत असल्याने यंदा गणेशोत्सवात शाडूच्या गणपती मूर्तींचाच अधिक बोलबाला असल्याचे चित्र दिसत होते.
प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी १.४५ वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त
श्री गणरायाच्या मूर्तीची घरी स्थापना करण्यासाठी आज दिवसभर मुहूर्त आहे. मात्र, पंचांगानुसार उत्तम मुहूर्त सकाळी ११ ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत आहे. विधिवत प्रकारे मूर्ती घरी आणल्यावर स्वागत करावे. प्राणप्रतिष्ठा, आरती झाल्यावर गणरायाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा.
दिवसभर आहे मुहूर्त
गणपती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी दिवसभर मुहूर्त आहे. मात्र, उत्तम मुहूर्त पंचांगानुसार आज दुपारी १.४५ पर्यंत असून, त्याप्रमाणे घरी स्थापना करावी. - प्रदीपशास्त्री बोरकर गुरुजी
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला रविवारी शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी गणरायाची मूर्ती वाजतगाजत नेली.
बातम्या आणखी आहेत...