आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात नगरपालिकांसाठी आज मतदान, मनमाडला ११ संवेदनशील केंद्रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - येथील नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपुष्टात आला. रविवारी सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ होणार असून, ११ मतदान केंद्र संवेदनशील घाेषित करण्यात अाली अाहेत. प्रचार काळात उमेदवारांत झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक यंत्रणा पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, शहरात व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पोलिस निरीक्षक, १७ उपनिरीक्षक, १५० पोलिस कर्मचारी, ८८ स्त्री-पुरुष होमगार्ड, राज्य राखीव दलाचे प्लॅटून (५०)कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील प्रत्येक मतदान केंद्रांवर उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलिस आणि एस.आर.पी. बंदोबस्तासाठी अाहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी नाकाबंदी, सर्च कोम्बिंग ऑपरेशन केले. तसेच उपरोक्त सर्व सशस्त्र बंदोबस्तासह शहराच्या विविध भागातून सशस्त्र संचलन (रूट मार्च) करून नागरिकांनी निर्भयतेने मतदान करावे, असा संदेश दिला. शनिवारी सकाळी मतदान प्रक्रिया राबविणारे अधिकारी, कर्मचारी, निवडणूक प्रशासन आणि पोलिस अधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन कायदा सुव्यवस्था तसेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक त्या सूचना सर्व करण्यात आल्या. रविवारी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली. यावेळी सहायक अधिकारी चंद्रकांत देवगुणे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर उपस्थित होते. शनिवारी सकाळी आययूडीपी येथील पालिका इमारतीत निवडणूक यंत्रणा राबविणारे अधिकारी, कर्मचारी दाखल झाल्यानंतर त्यांचा अंतिम प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना वोटिंग मशिनसह अत्यावश्यक कागदपत्रे साहित्य वितरित करण्यात आले. त्यानंतर राज्य परिवहन मंडळाच्या पाच बसेस खासगी वाहनांतून ते साहित्य मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. दुपारनंतर शहरातील सर्व मतदान केंद्रे या यंत्रणेने ताब्यात घेतली. रविवारी आठवडे बाजार असला तरी निवडणुकीमुळे तो बंद ठेवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...