आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tool Down Agitation Contiune Due To Praveen Shinde Suspension Not Take Back

प्रवीण शिंदे यांच्यावरील निलंबन मागे न घेतल्याने ‘महिंद्रा’तील टूल डाऊन आंदोलन सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कामगारांचे आंदोलन दुस-या दिवशीही कायम राहिले. व्यवस्थापनाने युनियनचे सरचिटणीस प्रवीण शिंदे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्याने संयुक्त कामगार कृती समितीसह कामगार विकास मंचच्या नेत्यांनी टूल डाऊनचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान कंपनीच्या शहरातील दोन्ही प्लॅँटमधील कामकाज बुधवारीही ठप्पच राहिले.यादरम्यान 500 गाड्यांचे उत्पादन होऊ शकले नसले तरी तीन आठवडे पुरेल इतका वाहनांचा साठा उपलब्ध असल्याने विक्रीवर या आंदोलनाचा परिणाम झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान हे आंदोलन चिघळू नये आणि औद्योगिक शांततेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये याकरिता कामगार आणि व्यवस्थापन यांच्या वतीने दिवसभर प्रयत्न सुरू राहिले. निलंबनाची कारवाई मागे घेतल्याशिवाय व्यवस्थापनाशी बोलणी करायची नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला. त्यानंतर संयुक्त कामगार कृती समिती आणि कामगार विकास मंच या संघटनांच्या प्रतिनिधींनी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे यांसह पदाधिका-यांची भेट घेत मध्यस्थी करण्याबाबत मागणी केली. सिटूचे नेते डॉ.डी.एल.कराड आणि कामगार विकास मंचचे अध्यक्ष कैलास मोरे आदींनी कामगारांची बाजू मांडली.

गुरुवारी बैठक
कामगार उपायुक्त आर.एस.जाधव यांनी सायंकाळी कामगार नेत्यांशी चर्चा केली, मागण्या जाणून घेत त्यांनी व्यवस्थापनाशी बोलणी केली. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी जाधव यांच्या दालनात गुरुवारी सकाळी 11.30 वाजता बैठक होणार आहे.

सकारात्मक पाऊल
सिटू नेते डॉ. डी.एल. कराड यांनी तीस वर्षांत प्रथमच बुधवारी निमा हाऊसमध्ये येऊन अध्यक्ष धनंजय बेळे यांची भेट घेतली. कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्याने चर्चा घडवून आणण्यासाठी निमाने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे.