आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक काळात ‘टॉप टेन’ गुन्हेगारांना द्यावी लागेल विभाग आणि परिमंडळ कार्यालयात ‘हजेरी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगरपालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या वेळीच राजकीय पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडल्याने पोलिस प्रशासनाकडून शहरातील टॉप टेन गुन्हेगारांवर निवडणुकीच्या काळात नजर ठेवली जात असून, आता या गुन्हेगारांना विभाग आणि परिमंडळ कार्यालयात नियमित ‘हजेरी’ द्यावी लागणार आहे. परिमंडळ मधील १३ पोलिस ठाण्यात प्रत्येकी १० अशा १३० टॉपटेन गुन्हेगारांना नियमित हजेरी द्यावी लागणार आहे. यासह रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि प्रतिबंधक कारवाई केलेल्या गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात नियमित हजेरी लावण्यात आली आहे. 

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवाराच्या खुनाच्या घटनेनंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये धडक कारवाई करण्यात आली. टॉप टेन गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. निवडणुकीचे अर्ज भरताना राजकीय पक्षांमध्ये झालेला ‘राडा’ शमला असला तरी अंतर्गत धुसफूस अद्याप सुरूच आहे. निवडणूक काळातही हे वाद आणखी उफळण्याची शक्यता असल्याने या टॉप टेन गुन्हेगारांना हजेरी लावण्यात आली आहे. निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची ‘हमी’ गुन्हेगारांकडून घेतली जाणार आहे. सर्वाधिक नामचिन गुन्हेगार अंबड, पंचवटी आणि नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. 

आडगाव, सरकारवाडा, भद्रकाली, सातपूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सराईतांचा समावेश आहे. या सर्व गुन्हेगारांना विभाग ते आणि परिमंडळ ते या कार्यालयात हजेरी लावण्यात आली आहे. दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यात आली आहे. उपआयुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील यांनी सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, डॉ. राजू भुजबळ, अतुल झेंडे, मोहन ठाकूर यांच्यासह १३ पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना आदेश देत टॉप टेन गुन्हेगारांना हजेरी लावण्याचे अादेश दिले. यामध्ये काही इच्छुक उमेदवारांचाही समावेश अाहे. 

प्रसंगी राजकीय नेत्यांवरही कारवाई 
निवडणूक काळ‌ात कुठलाही गुन्हा घडल्यास गुन्हेगारांवर वरदहस्त असलेल्या राजकीय नेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. पोलिस ठाण्यात हजेरी देणे बंधनकारक राहणार आहे. या कारवाईसह गुन्हेगार चेकिंग, कोम्बिंग ही कारवाई सुरूच राहणार आहे. मतदानासाठी गुन्हेगारांकडून दबाव असल्यास पोलिसांशी संपर्क साधा. -डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
 
बातम्या आणखी आहेत...