आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Leaders Battle: Shiv Sena's Sambhaji Pawar Tough Challenge Before Bhujbal

दिग्गजांच्या लढती: शिवसेनेच्या संभाजी पवारांचे भुजबळांना भारी आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशी अनेक पदे उपभोगले राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते व ओबीसींचे राष्ट्रीय नेते म्हणून ओळख असलेल्या छगन भुजबळांची यंदा येवला मतदारसंघातून राजकीय कसोटी लागणार आहे. शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांनी उभे केलेल्या तगड्या आव्हानामुळे ही निवडणूक भुजबळांसाठी अस्तित्वाची समजली जात आहे.

माजी आमदार मारोतराव पवार यांचे या मतदारसंघातील गावोगावी असलेले कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आणि दांडगा जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी आपले पुतणे संभाजी पवारांना भुजबळांविरोधात रिंगणात उतरवले आहे. त्यातच भाजपकडून शिवाजी मानकर हेही लढत देत असल्याने चुरस आणखीच वाढली आहे. मानकर हे लासलगाव परिसरातील रहिवासी आहेत. ते या भागातून किती मते घेतात, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.

भुजबळ हॅटट्रिक साधणार का?
शरद पवारांचे निष्ठावंत आणि खंदे समर्थकांच्या नाशिक जिल्ह्याच्या यादीत अग्रभागी असणारे माजी आमदार मारोतराव पवार यांनी आपला पुतण्या संभाजी पवारांसाठी शिवसेनेकडून सारी शक्ती पणाला लावली आहे, तर लोकसभेत झालेला दारूण पराभव भुजबळांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भुजबळांच्या राजकीय जीवनात अस्तित्वाची लढाई असल्याचे दिसून येत आहे. मोदी लाटेमुळे शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागलेल्या भुजबळांना या निवडणुकीत ओबीसी विरुद्ध इतर असा प्रचार होऊ नये, यासाठी अंतिम टप्यात चांगलेच लक्ष द्यावे लागणार आहे. तर मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे आहे, मात्र जे काम बाकी आहे. ते काम भुजबळच पूर्ण करू शकतील, असा मतप्रवाह येवल्यातील नागरिकांत आहे. या मतदारसंघाचा इतिहास बघता कुठल्याही उमेदवाराने हॅटट्रिक साधलेली नाही. हा इतिहास माेडीत काढून भुजबळ नवा विक्रम करतात की राजकीय आयुष्यातील माझगाव, नाशिकनंतर येवल्यातून आता पराभवाची हॅटट्रिक साधतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

* भुजबळांनी दिल्या रस्ते, आरोग्याच्या सुविधा

छगन भुजबळ- बलस्थाने
* दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख.
* रस्ते, आरोग्य या सुविधा दिल्या.
* मनी, मसल पॉवरच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे कसब.
* विकासाचे मॉडेल उभे करण्यासाठी प्रयत्न केले.
उणिवा
* येवला तालुका टँकरमुक्त करण्यास अपयश.
* पुणेगाव - दरसवाडी डोंगरगाव हा पोहोच कालवा ४० वर्षापासून रखडलेला. तो पूर्ण करण्यत अपयश
* जातीपातीच्या राजकारणामुळे मराठा व इतर समाजात असलेली नाराजी.
* स्थानिक नेतृत्वाला सतत सोबत ठेवण्यात येत असलेले अपयश.
* वचननाम्यात आश्वासने देऊनही औद्योगिक वसाहत करू शकले नाही.

संभाजी पवार बलस्थाने
* माजी आमदार मारोतराव पवार यांचे गावोगावी असलेले कार्यकर्त्यांचे जाळे.
* खते, बियाणे, वीज, पाणीप्रश्न व सर्वसामान्यांच्या गरजांसाठी गेल्या काही वर्षापासून आंदोलने व उपोषण.
* सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारा नेता अशी प्रतिमा.
* मराठासह इतर समाजातून मिळत असलेले पाठबळ.
* युवा वर्गाची मोठी फळी
उणिवा
* स्थानिक नेते विरोधात, युती तुटल्याने मतांचे होणार विभाजन.
* पंचायत समितीनंतर प्रथमच विधानसभा निवडणूक लढविताना वजनदार व्यक्तिमत्त्वाशी लढाई.
* माजी आमदार कल्याणराव पाटलांची निवडणुकीत मिळत नसलेली साथ.

जातीय समीकरणाचा परिणाम होणे शक्य
येवला- लासलगाव असा एकत्र मिळून झालेल्या या मतदारसंघात जातीय गणितावर कधी निवडणुकीचे राजकारण झाले नाही. मात्र, लोकसभेनंतर जातीय समीकरण पुढे आल्याने राजकारणात ढवळाढवळ सुरू झाली आहे. हाच धोका भुजबळांना आहे, तो कितपत यशस्वी होतो हे निकालातच स्पष्ट होणार आहे.

उद्धव ठाकरे यांची सभा पवारांना तारणार?
भुजबळांच्या मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ऐनवेळी रद्द झाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शिवसेना भुजबळांच्या विरोधात चांगलीच सरसावली आहे. उद्धव ठाकरे यांची सभा येवल्यात होत असल्याने ही सभा पवारांना तारणार का? हा सवाल चर्चिला जात आहे.