आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वरला गंगाद्वाराचे घेता येणार हवाई दर्शन; पर्यटन महामंडळाचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई राइड सुरू करण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा प्रस्ताव आहे. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांपैकी अनेकांना शारीरिक व्याधींमुळे किंवा वेळेअभावी ब्रह्मगिरी पर्वतातील गंगाद्वारापर्यंत पोहोचता येत नाही. त्यांच्या या इच्छेचा विचार करून पर्यटन विकास महामंडळातर्फे या हवाई राइडचा प्रस्ताव तयार केला जात असून त्यासाठी हेलिपॅडसाठीच्या दोन जागाही निवडण्यात आल्या आहेत.   

त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज १० हजार भाविक येतात. श्रावणी सोमवार, शनिवार अशा विशेष दिवशी हे प्रमाण दुपटीने वाढते. महाशिवरात्रीसारख्या सणाच्या दिवशी तर हा आकडा लाखात पोहोचतो. परंतु, यापैकी काही जणच गंगाद्वारापर्यंत पोहोचू शकतात. विशेषत: वयोवृद्ध भाविकांना इच्छा असूनही गंगामुखाचे दर्शन घेता येत नसल्याची खंत राहते. या भाविकांचा विचार करून, त्र्यंबकेश्वर परिसरात हेलिकाॅप्टरची हवाई राइड सुरू करण्याचा प्रस्ताव पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. यात गंगामुखाच्या दर्शनासह अंजिनेरी या हनुमान जन्मस्थानाचे दर्शन आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा याचा समावेश असू शकतो. यासाठी आवश्यक हेलिपॅडसाठी दोन जागांचीही पाहणी प्राथमिक स्तरावर करण्यात आली आहे.
 
मंत्र्यांची अनुकूलता  
त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांमधील ज्येष्ठ नागरिकांची ही मागणी होती. विशेषत: दक्षिणेतील आंध्र प्रदेशासारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येथे भाविक येतात. त्यामुळे हवाई राइडमधून त्यांना गंगामुख, हनुमान जन्मस्थळ यांचे दर्शन आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसराचा अास्वाद घेता येणार आहे. पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांनीही सदर प्रस्तावास अनुकूलता दर्शवली आहे.   
नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक,  पर्यटन विकास महामंडळ
बातम्या आणखी आहेत...