आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनदिन विशेष: विविध रंग अाणि चवींतील वाइन ठरतेय पर्यटकांचे आकर्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लाल,पिवळी, सफेद, नारंगी, गुलाबी, लाइट चाॅकलेटी अशा विविध रंगांची, तर गोड, आंबट, जिभेला चरका देणारी आणि अस्सल नाशिकच्या वातावरणात द्राक्षापासून तयार करण्यात आलेल्या वाइनची चव घेण्यासाठी केवळ राज्यातूनच नव्हे, तर परराज्यासह परदेशातून पर्यटक जिल्ह्यात येतात. त्यामुळे वर्षाकाठी नाशिकमध्ये अडीच ते पावणेतीन लाख पर्यटक खास वाइन टुरिझमसाठी येतात.

जिल्ह्यातील हवामान हे विविध द्राक्षांच्या जातीसाठी अनुकूल असल्याने वाइनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण मानले जाते. त्यामुळे जिल्ह्यात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ३९ वायनरीजमध्ये वाइन तयार केली जात आहे. दिवसेंदिवस वाइन टुरिझमच्या विकासासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यामध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. वायनरीजमध्ये केवळ वाइन तयार करून तिची विक्री करणे एवढेच मर्यादित राहिले नसून, या ठिकाणी एखाद्या पिकनिकचे स्वरूप कसे प्राप्त होईल, यासाठी वाइन मालकांनी प्रयत्न सुरू केले आहे. ज्याप्रमाणे पर्यटनस्थळावर माहिती देण्यासाठी जागोजागी गाइड दिसून येतात, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील वाइन आणि वायनरीजबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मनोज जगताप प्रयत्न करतात.

नाशिकमध्ये वाइन टुरिझमच्या माध्यमातून शहरातील हाॅटेल्स, ट्रॅव्हल्स, खाद्यपदार्थ यांचेही व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीसाठी वाइन टुरिझम हे एक महत्त्वपूर्ण पर्यटन ठरत आहे.
जनजागृतीसाठी लवकरच प्रस्ताव
नाशिक जिल्ह्यातील वाइन पर्यटन वाढविण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून सातत्याने राज्य शासनासोबत बैठका घेत आहोत. यामध्ये पंचतारांकित हाॅटेलप्रमाणेच वाइनला ड्राय डेमधून वगळण्यात यावे. एमटीडीसीच्या वेबसाइटवर वाइन पर्यटनाबाबत जनजागृतीसाठी प्रस्ताव दिले आहे. - यतीन पाटील, अध्यक्ष, वाइन उत्पादक संघ

युवावर्गाचे वाइन ठरतेय आकर्षण
वाइन उत्पादकांनी वाइनमध्ये नवनवे प्रयोग करून वाइनची चव, रंग हे आकर्षक केले आहे. त्यामुळे युवावर्ग वाइनकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. - शिवाजी आहेर, रेनिसन्स वाइन

दरवर्षी १५ टक्के वाढ
वाइन टुरिझममुळे खऱ्या अर्थाने बेरोजगारांना आणि शेतकऱ्यांना फायदा होत आहे. वर्षाकाठी किमान पावणेतीन लाख वाइन पर्यटक येतात. दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ होते. - मोनित ढवळे, उपाध्यक्ष, सुला विनियार्ड
बातम्या आणखी आहेत...