आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tourist News In Marathi, Nashik's Tourist Place On Google, Divya Marathi

नाशिकच्या सौंदर्यस्थळांचा ‘पॅनॉरॉमिकल व्ह्यू’ गुगलवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारतातील महत्त्वाच्या स्मारकांपैकी 30 स्मारकांची 360 अंशांमधून घेण्यात आलेली छायाचित्रे गुगलवर उपलब्ध करून देण्याची योजना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नाशिकच्या पाच स्थळांची ‘पॅनॉरॉमिकल व्ह्यू’ची अतिशय सुंदर छायाचित्रे यापूर्वीच काही तरुणांनी गुगलमॅपवर अपलोड केलेली आहेत. त्यामुळे नाशिकच्या लौकिकात भरच पडत आहे. मात्र, अशा प्रसिद्धीमुळे या स्थळांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अनेक प्रकारच्या संकेतस्थळांवर आकर्षक फीचर्स सध्या उपलब्ध होत आहेत. गुगल सर्च इंजिननेदेखील काळानुरूप बदल करून आपले संकेतस्थळ अपडेट ठेवले आहे. गुगलमॅपवरच स्ट्रिटी व्ह्यू ट्रेकर तंत्रज्ञानाचा वापरदेखील प्रभावीपणे केला जात आहे. याच ट्रेकरवर पॅनॉरॉमिकल छायाचित्र टाकण्याची सुविधा गुगलने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे निसर्गरम्य स्थळांचे 360 अंशांमधील छायाचित्र टाकणे सर्वसामान्यांनादेखील सोपे झाले आहे. या सुविधेचा फायदा घेत पाच तरुणांनी शहरासह जिल्ह्यातील पाच स्थळांची छायाचित्रे गुगलमॅपवर टाकली आहेत.

छायाचित्रांची खासियत
गुगलमॅपवर नाशिक परिसरातील पांडवलेणी, गोदावरी नदीजवळील वसाहत, संदीप फाउंडेशन महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर परिसर, शेवगेडांग धरण येथील छायाचित्रे टाकण्यात आली आहेत. ही छायाचित्रे 360 अंशांतून घेतली गेली असल्याने ती पाहताना आपण स्वत:च तेथे उपस्थित असल्याचा भास होतो. संगणकाचा माउस फिरवून वा टचपॅड असेल, तर नुसत्या बोटानेदेखील चारही बाजूंचे दृश्य पाहता येते. विशेष म्हणजे डोक्यावरचा भाग ते पायापर्यंत अशा उभ्या दिशेने वरपासून खाली वा खालून वरपर्यंतचा भागही यात दिसतो. एखादे मंदिर वा लेणी असतील, तर अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरल्याचे दिसते. मात्र, त्यामुळे काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुरातन वास्तूंचे होणार दर्शन
राज्य सरकारकडे याबाबत प्रस्ताव आल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत 30 स्मारकांचे काम पूर्ण झालेले आहे. यासंदर्भातील उर्वरित 70 स्मारकांचीही ऑनलाइन सफर घडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.