आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नगररचना’च्या अर्थकारणाला लगाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- 2 एप्रिल 2013 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयातील पथकाने धुळ्यात सापळा रचून आरेखकाला पकडल्याची बातमी पसरली. त्यावेळी दोंडाईचा, शिंदखेडा आणि धुळ्यातील बांधकाम व्यावसायिक असो वा शेतकरी वा विकासक यांना जमिनीच्या खरेदी-विक्रीपासून ते बिनशेतीत रूपांतरित करणे, लेआउट टाकण्यासाठी नगररचना खात्याची परवानगी घेणे, अशा कामांसाठी अधिकार्‍यांना ‘दक्षिणा’ द्यावी लागत होती.

सर्व कागदपत्रे योग्य असतानाही अधिकारी, कर्मचार्‍यांकडून उघडपणे पैशांची मागणी व्हायची. त्रस्त ग्राहकांनी वरिष्ठांबरोबरच खुद्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रारी केल्या. मात्र, सापळे रचण्यापूर्वीच लाचखोर सावध झाले. त्यातून लाचखोर व यंत्रणेतील हस्तकांचे लागेबांधेही उघड झाले. या प्रकारामुळे तक्रारदारांचा यंत्रणेवरील विश्वास काही प्रमाणात उडू लागला. दुसरीकडे शेजारील नाशिक जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अशी लाचखोर अधिकारी पकडण्याची मालिकाच सुरू होती. हे बघून दोंडाईचा पंचायत समितीचे माजी सदस्य व व्यावसायिक ज्ञानेश्वर भामरे यांनी नाशिक कार्यालय गाठले. भामरे यांचा धुळे जिल्ह्यात त्यावेळी पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत असताना उपअधीक्षक शालिग्राम पाटील यांच्याशी परिचय होता. त्यामुळे लाचखोरीबाबत चर्चा झाल्यावर पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्यासमोर तक्रारदारास उभे केले.

दुपारी 11.30 वाजता तक्रारदार कार्यालयात आल्यावर काही मिनिटांतच फिर्याद घेतली गेली. आरेखकाला कार्यालयातूनच फोन लावण्यास सांगितले. अकारण हुज्जत न घालता जास्तीजास्त बोलते ठेवून आजच्या आजच पैशाची देवाणघेवाण करण्याचे सांगितले गेले. मात्र, समोरील बहाद्दराने फोन केल्यावर कोणताही विचार न करता ‘अहो पैसे कधी आणता, तुमचे काम करून ठेवले आहे. नकाशा तयार आहे, पटकन या आणि घेऊन जा’, असे सांगितले. तक्रारदाराने किती पैसे द्यायचे, असे विचारल्यावर आपला रेट एकरी 30 हजार रुपये असल्याचे सांगितले. तक्रारदाराने काही कमी करा, अशी विनंती केल्यावर आरेखकाने वरिष्ठांना द्यावे लागतात, असे सांगत भाजीपाला आहे का कमी करण्यासाठी, असे बोलत फोन बंद केला. लाचलुचपत खात्यासाठी हे पुरेसे होते. त्यांनी संभाषण रेकार्ड करून पुढील तयारी केली. सरकारीऐवजी खासगी वाहनातून नॉनस्टॉप धुळे गाठले. साधारणत: पाचच्या सुमारास पोहोचत नाही तोच आरेखकाने तक्रारदारास फोन केला. ऑफिस बंद होण्याची वेळ आली, कधी येतो, असे विचारल्यावर तक्रारदाराने दहा मिनिटांत येतो, असे सांगितले. त्यानंतर जागेवरच खासगी गाडीत नोटांच्या बंडलांना विशिष्ट पावडर लावून त्यांचे नंबर नोंदवण्यात आले.

कोणत्याही परिस्थितीत आरेखकाच्या हातात नोटा जातील अशी दक्षता तक्रारदाराने घ्यावी, असे सांगण्यात आले. तक्रारदार व पंचांनी आरेखक प्रवीण र्शीराम खंडेराय (पाटील)यांच्या कक्षात प्रवेश केल्यावर त्यांनी किती वेळ लावला, अशी विचारणा करीत पैशांची मागणी केली. समोर नागरिक बसले आहेत, याची तमा न बाळगता ड्रॉवर उघडून त्यात रक्कम टाकण्यास आरेखकाने सांगितले. त्यावर तक्रारदाराने साहेब पैसे कमी-जास्त आहेत का ते मोजून घ्या, असे सांगितले. पैशांना आरेखकाच्या हाताचा स्पर्श झाल्याचे बघून तक्रारदाराने लागलीच इशारा केला व काही सेकंदांत उपअधीक्षक पाटील व कर्मचार्‍यांनी प्रवीण खंडेराय यास ताब्यात घेतले. तो काही बोलण्यापूर्वीच ड्रॉवरमध्ये हात घालून रोकड काढली. अंगझडती घेतल्यावर दोन्ही खिशांत नोटा, जेवणाच्या डब्याच्या पिशवीत बंडल, अशी जवळपास साडेतीन ते चार लाख रुपयांची रोकड हाती लागली. कार्यालयात कारवाई सुरू असताना स्थानिक पथकास कळवून त्याच्या घराची झडती घेण्यास सांगितले. संशयिताकडून पाच महागडे हॅण्डसेट, लॅपटॉप, विविध बँकांचे पासबुक, खिशात सहा एटीएम कार्ड, तसेच दोन कार, दोन दुचाकी, दोन प्लॉट्सची कागदपत्रे हाती लागली.

दोन चिठ्ठय़ांमध्ये नोंदी
पाटील यांनी खंडेरायच्या समोरील फाइल, खिशातील कागदपत्रे तपासली असता दोन चिठ्ठय़ा आढळून आल्या. त्यात दोन दिवसांत ज्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांच्या नावांसमोर आकडे लिहून ठेवलेले आढळले. हजार रुपयांपासून ते 50-60 हजारापर्यंत पैसे स्वीकारल्याच्या नोंदी होत्या. दरम्यान, छाप्यानंतर रात्री उशिरापर्यंत महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. एवढय़ावरच न थांबता महिनाभरात सबळ पुरावे गोळा करीत अभ्यासपूर्ण दोषारोपपत्र पाटील यांनी दाखल केले.

सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात कार्यरत असलेल्या लाचलुचपत खात्याला तक्रारदार शोधण्यापासून व्यवस्थित पाठपुरावा करून सावज जाळ्यात अडकविण्यापर्यंत जीवावर उदार होऊन कसरत करावी लागते. चुकून सावजाला कुणकुण लागली वा तक्रारदार ऐनवेळी फुटला तर स्वत:च आरोपीच्या पिंजर्‍यता उभे राहण्याची नौबत लक्षात घेऊन अत्यंत नियोजनबद्धरीत्या सापळा रचावा लागतो. नाशिकमध्ये कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्यावरील कारवाईमुळे चर्चेत आलेले पोलीस उपअधीक्षक शालिग्राम पाटील यांनी सर्वसामान्यांच्या घरांपासून तर बांधकाम व्यावसायिकांपर्यंत सर्वांच्या तोंडी असणार्‍या नगररचना विभागातील अर्थकारणाला उजेडात आणण्यासाठी शिताफीने सापळा रचला व एका आरेखकाला प्रत्यक्ष लाच घेताना पकडून येथील एकूणच अर्थकारणाला जबरदस्त लगाम लावला.

राज्यभरात गाजलेला सापळा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या यशस्वी झालेल्या सापळ्यात उपअधीक्षक पाटील यांनी सखोल तपास केला. त्यात राज्यभरातील बॅँकांचे लॉकर्स, खाते तपासून 17 कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली. यात रोख नऊ कोटी रुपये व 15 किलो सोन्याचा समावेश आहे. याच गुन्ह्यात अधीक्षक डॉ. महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीकर पती-पत्नीविरुद्ध अपसंपदेचा गुन्हाही दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांत संशयितांना शिक्षा होईल इतके सक्षम पुरावे पाटील यांनी जमा केले आहेत. आतापर्यंत 30 वर्षांच्या सेवेत अनेक आव्हानात्मक गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांना यश आले असून, 200हून अधिक बक्षिसे, प्रशस्तिपत्रके त्यांना शासनाकडून मिळाली आहेत.