आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडको- गोविंदनगर येथे गुरुवारी सकाळी ट्रक व मोटारसायकल यांच्या अपघातात पंचवटीतील पती-पत्नी ठार झाले. मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी ते जात असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वसंत पांडुरंग माळी (वय 61, रा. अमृतधाम, पंचवटी) पत्नी रंजना माळी (वय 45) यांच्यासह मोटारसायकलवरून (एम.एच. 15 9205) पाथर्डी फाट्याकडून इंदिरानगरकडे जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (एम. एच. 15 बी.जे. 7041) जोरदार धडक दिली. दोघांच्या डोक्याला जबर मार लागला. वसंत माळी जागेवरच ठार झाले. रंजना माळी यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली.
आता कसला आनंदसोहळा? : माळी यांच्या मुलाचे 31 जानेवारीला लग्न होते. त्याच्या पत्रिका सिडकोत वाटल्यानंतर ते इंदिरानगरला नातेवाइकांकडे जात होते. कुटुंबातील आनंदसोहळ्याला साक्षी होण्याचे निमंत्रण आप्त-मित्रांना देण्यासाठी जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मुलाच्या लग्नाचा आनंद घेण्याअगोदरच आई-वडिलांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
महामार्गावरील वाहतूक कारणीभूत
मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा जटिल प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पूल वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे वाहने अतिवेगात धावतात. तर अनेक ठिकाणी सर्व्हिसरोडचेही काम सुरू असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. एकमेकांच्या पुढे जाण्याच्या नादात अनेक चालक शिस्त तोडतात. हाच प्रकार अपघातास कारणीभूत ठरत आहे. ट्रक बेफाम धावत असल्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.