आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरातील व्यापार आजपासून बंद; महाआरतीने सुरू होणार आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एलबीटी विरोधासाठी एकवटलेल्या तीसपेक्षा अधिक व्यापारी संघटनांनी गुरुवारपासून बेमुदत बंद पुकारला असून रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीची महाआरती करून आंदोलन सुरू होईल. व्यापारी मोर्चाद्वारे जाऊन जिल्हाधिकारी विलास पाटील यांना निवेदन देणार आहेत. दैनंदिन 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे.

एलबीटीमधील जाचक अटी व्यापारास मारक असल्याचा आरोप नाशिक व्यापार समितीने केला आहे. ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरुनानी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व्यापारी संघटनांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसला रामराम करून राजन दलवानी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. किराणा, धान्य, सीमेंट, सराफ, संगणक, हार्डवेअर, कापड, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील व्यापारी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याची माहिती प्रफुल्ल संचेती यांनी दिली. दरम्यान, आमदार वसंत गिते यांनी व्यापार्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा असला तरी ग्राहकांना वेठीस धरण्यास विरोध असल्याचे सांगितले.

मॉल सुरू राहणार असल्याने पर्याय उपलब्ध असेल मात्र, एलबीटीतून मॉलही सुटणार नसल्याने त्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी मॉल संचालक, व्यवस्थापकांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी करणार असल्याचे फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले.

25 कोटींची उलाढाल थंडावणार
वरील वस्तूंच्या विक्रीतून शहरात किमान 25 कोटींची उलाढाल होते. बेमुदत बंदमुळे ही उलाढाल थंडावणार आहे. सर्वसामान्यांची मात्र किराणापासून धान्यापर्यंत सर्वच गोष्टींसाठी ससेहोलपट होणार आहे.

या आहेत मागण्या
> एलबीटीतील तरतुदीच नाही, तर हा करच नको.
> एलबीटीसाठी नोंदणी करणार नाही.
> मूल्यवर्धित करातच दीड टक्क्यापर्यंत कर वाढवून देण्यास तयार.

छोट्या व्यापार्‍यांना वगळा
स्थानिक संस्था करास विरोधामागे छोट्या व्यावसायिकांना होणारा त्रास हे मुख्य कारण असून त्याबाबत महाराष्ट्र चेंबरने शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. त्यातील काही तरतुदी शासनाने मान्य केल्या असून त्याबाबतचा अधिकृत अध्यादेश प्रसिद्ध झाला आहे. काही तरतुदींचा पाठपूरावा सुरू असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी म्हटले आहे.

60 लाखांपर्यंत उलाढाल किंवा व्हॅट ऑडिट र्मयादेत असलेल्या व्यावसायिकांना एलबीटीतून वगळण्यात यावे, अशी मागणी केल्याचे सांगून ते म्हणाले, की जीवनावश्यक वस्तू वगळण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यात तेल, तूप, साखर यांचाही समावेश करावा. ‘अँसेसमेंट’ सरसकट न करता 1 ते 2 टक्के रॅँडम पद्धतीने आयकर, व्हॅट या धर्तीवर करावी. वादग्रस्त प्रकरणासंदर्भात अपिलासाठी लवादाची तरतूद असावी.

महाराष्ट्र चेंबर सातत्याने व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांच्या प्रश्नांचा विचार करते, असे सांगून ते म्हणाले, की गेली 80 वर्षे महाराष्ट्र चेंबरने सातत्याने व्यापारी-उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे.