आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीचा सारा खेळखंडोबा, विद्यार्थ्यांचे हाल,बेपर्वा वाहनचालक अन् हतबल पोलिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महायुती आणि आघाडी यांची गुरुवारी काडीमोड झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा असूनही वाहतुकीचे नियोजन पुरते कोलमडले आणि वाहनधारकांसह पादचा-यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
नाशिक शहरातील मध्य, पूर्व, पश्चिम आणि देवळाली या चारही विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची झालेली गर्दी, न्यायालयात येणाऱ्यांची वर्दळ आणि शासकीय कामकाजासाठी येणारे नागरिक यामुळे या संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिणामी, या भागात वाहतुकीचा बोजवारा उडाला. याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नाशिककरांना भोगावा लागला. विशेष म्हणजे पोलिसांची पूर्वतयारी आणि मोठा फौजफाटा असूनही ही परिस्थिती उद‌्भवली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाेलिसांनी उमेदवारांच्या समर्थकांना थोपविल्याने गर्दीत अधिकच भर पडली होती. इच्छुक उमेदवारांसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी आपली वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त लावल्याने वाहतूक कोंडीत भरच पडली. विशेष म्हणजे सीबीएस चाैकात वाहतूक पाेलिस उपस्थिती असताना, कोर्टासमोर एसटी बस थांबविल्या जात असल्याने, वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.वाहतुकीची कोडीं फोडण्याऐवजी राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेलाच पोलिसांकडून महत्त्व दिले गेल्याने, नागरिकांनी पोलिसांच्या अशा ढिसाळ नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी स्वतः पाेलिस अायुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर काही प्रमाणात वाहतुकीचा गुंता सुटण्यास मदत झाली.