आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक व्यवस्थेसाठी आता समन्वय समिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता विविध उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महापालिका, पोलिस यंत्रणेसह विविध विभागांची वाहतूक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

महापालिका आयुक्त संजय खंदारे आणि पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभाग, भारत संचार निगम, शहर वाहतूक शाखा, नाशिक फस्र्ट, नाशिक सिटिझन फोरम, वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांची शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत वाहतूक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी हे या समितीचे सदस्य असतील. या समितीची दर तीन महिन्यांनी बैठक होणार असून, शहरातील वाहतूक व उपाययोजनांविषयी माहिती घेतली जाणार आहे. त्यानुसारच कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आयुक्त खंदारे यांनी दिली. वाहतुकीसंदर्भात महापालिकेने शासनाकडे ट्रॅफिक सेल स्थापन करण्याविषयी यापूर्वीच प्रस्ताव सादर केलेला असून, तो मंजूर झाल्यास हा सेल कार्यान्वित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक फस्र्टचे अभय कुलकर्णी यांनी वाहतूक, नियम याविषयी सुयश हॉस्पिटललगत असलेल्या पेरूची बाग येथे तीन एकर जागेत ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क साकारण्याचा प्रस्ताव रखडल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर आयुक्त खंदारे यांनी महापालिकेकडून कार्यवाही सुरू असल्याचे सांगत त्यास पोलिस आयुक्त सरंगल यांनीही होकार देत ट्रॅफिक पार्क साकारण्यास अनुकूलता दर्शविल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. सध्या महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात ट्रॅफिक सेल स्थापून त्यासाठी दोन उपअभियंते आणि दोन शाखा अभियंत्यांची नियुक्ती केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
निर्णय तर घेतला; पण विसरच पडला होता - महापालिकेचे तत्कालीन आयुक्त बी. डी. सानप आणि तत्कालीन पोलिस आयुक्त विनोद लोखंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरातील वाहतूक प्रश्न हाती घेऊन साधारण वर्षभरापूर्वी वाहतूक समन्वय समिती स्थापन करीत बैठक घेतली होती. त्यांनीही दर महिन्याला या समितीची बैठक घेऊन उपाययोजना करणार असल्याचा मानस त्यावेळी व्यक्त केला होता. आता पुन्हा समिती स्थापन तर झाली आहे. मात्र, उपाययोजना खरोखरच होणार का, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. सन 1995 मध्येदेखील अशीच समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतरही मागील वर्षापर्यंत या समितीचा विसर संबंधितांना पडला होता.