आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये कोंडतोय वाहतुकीचा श्वास; रस्त्यांना जड झाले गाड्यांचे ओझे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे झपाट्याने विस्तारीकरण होत आहे. मात्र, वर्षानुवर्षे लांबी-रुंदी तितकीच असलेल्या या रस्त्यांवर मात्र दिवसेंदिवस वाहनांचा भार वाढतो आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडील वाहन नोंदणीच्या आकड्यांवर नजर फिरविली तर दरवर्षी हजारोंच्या संख्येने रस्त्यांवर वाहने उतरत आहेत. परिणामी, शहरातील रस्त्यांवर पार्किंग वाढल्याने वाहतुकीचा श्वास कोंडल्याचे चित्र ‘हार्ट ऑफ द सिटी’ मानल्या जाणार्‍या मेनरोड, एम. जी. रोड, सराफ बाजार परिसरात पाहायला मिळते आहे. ‘डीबी स्टार’ प्रतिनिधीने दिवसभर केलेल्या पाहणीत शहराच्या बहुतांश भागात पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी दिसून आली. वाहतूक पोलिसांच्या थंडावलेल्या मोहिमा आणि महापालिकेचे लेचेपेचे धोरण यामुळे सर्वसामान्य नाशिककरांना मात्र वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ येत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. पण, यात केवळ या संस्थाच नाहीत तर रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग करणारे महाभागही जबाबदार आहेत. यावर हा प्रकाशझोत..

व्यावसायिक शहराबाहेर
मेनरोडवर, एम. जी. रोडवरील पार्किंगच्या समस्येमुळे बहुतांश ग्राहक पार्किंगला जागा नाही म्हणून शॉपिंगसाठी थांबत नाहीत. याचा परिणाम व्यावसायिकांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळेच अनेक व्यावसायिक कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोड, गंगापूररोड यांसारख्या परिसरात दालने थाटत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या रस्त्यावरील व्यावसायिकांकडूनच पार्किंगचा वापर करण्याबाबत असहकार असल्याने ही स्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे.

ट्रॅफिक सेल लालफितीत
वाहतूक आणि पार्किंगला शिस्त लागावी, यासाठी महापालिकेतर्फे ट्रॅफिक सेल सुरू करण्यात येणार होता. या सेलमध्ये एक उपअभियंता, एक आरेखक, दोन शाखा अभियंता, दोन लिपिक आदी बारा जणांचा समावेश निश्चित करण्यात आला आहे. हा स्थापण्यासाठी महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी वारंवार आदेश दिले आहेत. गत दोन वर्षांपूर्वी सेलचा हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असला तरी अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही. ट्रॅफिक सेलला पडलेला हा लालफितीचा कारभार सर्वसामान्य नाशिककरांसाठी मात्र डोकेदुखी ठरतो आहे. यामुळे काही दिवसांपासून सातत्याने शहरातील गाड्यांची संख्या वाढताना पार्किंगची मात्र सोय नाही.

थेट प्रश्न- पी. बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता महापालिका

शहरात वाहतूकीचा बिकट प्रश्न निर्माण झालाय?
नो पार्किंगचे बोर्ड महापालिका लावते पण त्यासमोरच लोक गाड्या पार्क करतात. त्यावर कारवाई करण्याचे अधिकार मात्र वाहतूक पोलिसांना आहेत. त्यांच्याकडून कायद्याची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे.

पार्किंगमध्ये पार्किंग नाही तर व्यवसाय, गोडावून चालतात. महापालिका कारवाई करणार का?
निश्चित, तुम्ही औरंगाबाद महापालिकेचे उदाहरण दिले. त्याप्रमाणे कारवाई होऊ शकते. नगररचना अधिनियम 1962 सालापासून तोच चालत आहे. त्यातही बदल होणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यापारी संकुलांतील पार्किंगची क्षमता वाढू शकेल.

ट्रॅफिक सेलबाबत काय?
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेसाठी सन 2006-2007 साली सिटी ट्रॅफिक प्लॅन तयार करण्यात आला होता. पण, या योजनेत तरतूद असलेल्या बीआरटीसारखी योजना राबवायची म्हटली तर रस्त्यांची रुंदी किमान 40 मीटर हवी. आपल्याकडे त्र्यंबक रस्ता सोडला तर एकही रस्ता यात बसत नाही. त्यामुळे सेलचा उपयोग झाला नाही.

काही दिलासादायी घडेल का?
निश्चित, आमचे प्रयत्न सुरू आहेत. एका संस्थेच्या माध्यमातून आऊटर रिंग रोड, वाहतूक बेटे, चौक, सिग्नल, सर्वसाधारण वाहतुकीचा सव्र्हे केला जाणार आहे. हे सर्व प्राथमिक स्तरावर आहे. गावठाणात पार्किंगच्या सुविधा देण्यासाठी मल्टिलेयर पार्किंगची उभारणी प्रस्तावित आहे.