आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेशाचे उल्लंघन: नाशकात वाहतूक कोंडीत वाहनांचा ‘तळ’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश पुखराज बोरा यांनी महापालिका, पोलिस व एसटीच्या अधिकार्‍यांना अतिक्रमण हटविण्याबरोबर बसथांबा स्थलांतरित करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही त्याच्या अंमलबजावणीस यंत्रणांना मुहूर्त सापडत नाही, मात्र, महापालिकेने उत्पन्नवाढीच्या नावाखाली परस्पर खासगी ठेकेदारामार्फत पे अँण्ड पार्क योजना सुरू केल्याने कोंडीत भरच पडत आहे. या वाहनतळामुळे बसेस रस्त्याच्या मधोमध उभ्या राहात असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घालून बस पकडावी लागत आहे.

जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या संरक्षक भिंतीलगत मोठय़ा संख्येने चहाच्या टपर्‍या, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे हातगाड्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचबरोबर रस्त्यातच रिक्षाचालकांनी अनधिकृत थांबा निर्माण केल्याने सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास विद्यार्थी वाहतूक करणार्‍या बसेस रस्त्यातच थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून बसेसच्या मागे पळावे लागत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपूर्वीच तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश बोरा यांनी मनपा, पोलिस व एसटीच्या अधिकार्‍यांना बोलावून बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्रवेशद्वारावरील अतिक्रमणे हटवून रिक्षा, बसथांबा हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी पालिकेकडूनच अतिक्रमण हटविण्यात असर्मथता दर्शविली जात असल्याचे सांगितले. त्यानंतर आठवडाभर अतिक्रमण हटवित वाहतूक पोलिसही नियुक्त केल्याने रिक्षा थांबत नव्हत्या. एसटीनेही बसचा थांबा मध्यवर्ती बसस्थानकात स्थलांतरित केला. मात्र, आठवडा उलटताच पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. या अतिक्रमणासमोरच अतिक्रमण वाढत असून, त्यापुढे दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेची उदासीनता
न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन महामंडळाने बसस्थानक मध्यवर्ती बसस्थानकात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, रिक्षांचे थांबे आणि अतिक्रमण हटविण्याबाबत मनपा आणि पोलिसांनी उदासीनता दाखविल्याने एसटीलाच आर्थिक फटका बसला. दोन महिने बसथांबा बदलल्याने रिक्षाचालकांनीच व्यवसाय मिळविला. त्यातच आता याठिकाणी वाहनतळ उभारून मनपाने वाहतूक कोंडीत भरच पाडली आहे.
- कैलास देशमुख, विभागीय नियंत्रक

..तर वाहनतळ हटविणार
जिल्हा न्यायधीशांच्या बैठकीस आपणही उपस्थित होतो. मात्र, महापालिकेने कुठलेही अतिक्रमण हटविले नसून याठिकाणी जर वाहनतळाचा ठेका दिला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. सदरच्या वाहनतळाच्या ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन होत असेल आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास वाहनतळ हटविण्यात येईल.
-नंदुकुमार चौगुले, पोलिस उपआयुक्त

बसथांब्याचे शेडही वाहनांच्या विळख्यात
न्यायालयाच्या संरक्षक भिंतीलगत विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात शेडमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी रस्ताच उपलब्ध राहात नसून वाहनतळाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येते.

वाहनतळाच्या नियमांचे उल्लंघन; कामगारांची मग्रुरी
महापालिकेने वाहनतळाचा ठेका देताना संरक्षक भिंतीलगतचे अतिक्रमण काढून जागेचे क्षेत्रफळ मोजून ठेका देणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ठेकेदाराकडूनही मनमानी सुरू आहे. न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात येणारा प्रत्येक व्यक्ती विवंचनेत असतानाच ठेकेदाराचे कर्मचारी ‘भाईगिरी’च्या भाषेत पैसे मागतात. नियमानुसार ठेकेदाराच्या कामगारांनी गणवेश परिधान करणे आणि ठिकठिकाणी पार्किंगच्या शुल्कासह ठेकेदाराचे नाव, मोबाइल क्रमांक, क्षेत्रफळाचे फलक लावणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.