आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक सुरक्षेसाठी ‘गोड’ साकडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - वाहतुकीच्या नियमांचे पालन करून स्वत:सह दुस-यांचीही सुरक्षितता घेण्याच्या उद्देशाने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून रविवारी ‘नाशिक फर्स्ट’ या सामाजिक संस्थेतर्फे आयटीआय सिग्नलवर वाहनचालकांना तीळगुळाचे वाटप करून अभिनव उपक्रम राबवला.
अंजली ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक प्रदीप म्हसकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साजरा करण्यात आला. म्हसकर म्हणाले की, सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासन, पोलिस, कायद्याची माहिती व कायद्याचे पालन या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शहरात सुमारे अडीच लाख वाहनचालक असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त 182 पोलिस आहेत. त्यामुळे आपणच आपली सुरक्षा केली पाहिजे, यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. आयटीआय सिग्नल येथे सकाळी 8 वाजेपासून 9.30 वाजेपर्यंत वाहनचालकांना तीळगुळाचे वाटप करण्यात आले.
नाशिक फर्स्टच्या पदाधिका-यांनी वाहतूक नियम पालनासंदर्भात विविध प्रकारची घोषवाक्ये असलेले फलक हाती घेतले होते. ‘पोलिस नसतानाही मी सिग्नलवर थांबतो, कारण मी एक सुजाण नागरिक आहे’, ‘मीच माझा पोलिस’, ‘हेल्मेट वापरा’, ‘झेब्रा पट्ट्यांच्या पाठीमागे उभे राहा’, असे प्रबोधन त्यातून करण्यात आले होते. या उपक्रमात नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी, देवेंद्र बापट, विनिता धारकर, प्रमोद लाड, मिलिंद जांबोटकर, संजय देशमुख, सुनील कोतवाल, सुरेश पटेल, सुनीता देशमुख, सीमा बापट, सतीश आहेर आदी पदाधिका-यांचा समावेश होता.
‘नाशिक फर्स्ट’च्या पदाधिका-यांनी आयटीआय सिग्नलवर वाहनचालकांना पोलिसांच्या गैरहजेरीतही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
वाहतूक नियम पाळण्यासाठी गोड आठवण म्हणून वाहनचालकांना तीळगूळ देताना ‘नाशिक फर्स्ट’चे अभय कुलकर्णी.