आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रणा सुस्तावली; नियमांची पायमल्ली, बेशिस्त चालकांवर कडक कारवाई करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण मिळवून ती सुरळीत ठेवण्यासाठी विशिष्ट नियम तयार करण्यात अाले अाहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाेलिस प्रशासन कार्यरत असते. मात्र, अाजघडीला शहरातील विविध भागांत ना वाहनचालकांकडून या नियमांचे काटेकाेरपणे पालन हाेत अाहे, ना वाहतूक पाेलिसांकडून त्यांना शिस्तीचे धडे दिले जात अाहेत. परिणामी, वाहतुकीचा पुरता बाेजवारा उडाला असून, अपघातांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली असल्याचे दिसून येत अाहे.
शहरातील मेहेर सिग्नल, गडकरी चौक, द्वारका सर्कल, गंगापूर नाका, गंजमाळ, मुंबई नाका परिसरात ‘डी. बी. स्टार’ने प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली असता, वर्दळीच्या वेळीच वाहतूक पाेलिसांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली. सिग्नल यंत्रणा अाहे, मात्र तिचे पालनच हाेत नसल्याचे दिसून अाले. विशेष म्हणजे, झेब्रा क्राॅसिंगच्याही पुढे भररस्त्यात वाहने उभी राहात असल्याने अन‌् सिग्नल ताेडून पळणाऱ्यांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याचेही यावेळी दिसून अाले. याचबराेबर एकेरी मार्गात घुसखाेरी, नाे पार्किंगमध्ये उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळेही अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून अाले. अशा स्थितीत वाहतूक पाेलिसांनी कर्तव्यदक्षपणे कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तसे हाेताना दिसून अाले नाही.

पावसाळ्यात रेनकाेट घालून पाेलिसांनी कर्तव्य बजावणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी पाेलिस कर्मचारी जबाबदारी साेडून बाजूला कुठेतरी उभे राहून पावसापासून बचाव करताना दिसून अाले. यामुळे वाहतूक विस्कळीत हाेऊन काेंडी झाल्याचेही ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले. शहरात काही ठिकाणी पाेलिसांकडून नाकेबंदी करून काॅलेजियन्स, नाेकरदार वर्गाकडे कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याचे दिसून येत अाहे. अशा ठिकाणी पाेलिसांचा फाैजफाटाच उपस्थित राहून थातूरमातूर कारवाई करताे, मात्र गरज असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी पाेलिस कर्मचाऱ्यांची कमतरता भासते, हे विशेषच.

सर्व्हिस राेडसंबंधीची अधिसूचना कागदावरच
द्वारकासर्कल येथील वाहतूक काेंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी द्वारका सर्कलकडे सर्व्हिसराेडने येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांचा मार्ग वळविण्याबाबतची अधिसूचना वाहतूक पोलिसांकडून काढण्यात अाली खरी, मात्र अद्यापपर्यंत या मार्गावर कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावण्यात आले नसल्याने तसेच, या समांतर रस्त्यावर माेठ्या संख्येने उभ्या राहणाऱ्या लक्झरी बसेस, नादुरुस्त वाहनांमुळे काेंडीची समस्या अाजही कायम अाहे. याविरोधात वाहतूक पोलिसांकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची ठाेस कारवाई करण्यात आल्याने ही अधिसूचना केवळ कागदावरच असल्याच्या प्रतिक्रिया काही त्रस्त वाहनचालकांनी व्यक्त केल्या अाहेत.

कित्येक सिग्नल यंत्रणा फक्त शाेभेलाच...
शहरातील वडाळा नाका, द्वारका, मखमलाबाद नाका, गंजमाळ, पेठरोडकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या सिग्नल यंत्रणांसह शहरातील अन्य काही ठिकाणच्या यंत्रणा बहुतांश वेळेस बंदच असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या सिग्नल यंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना बंद असणाऱ्या या सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासंदर्भात वाहतूक शाखेसह महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

{नाे पार्किंग : याेग्य ठिकाणी वाहने लावली जावीत वाहतुकीला अड‌थळा हाेऊ नये
{एकेरी मार्ग : वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक काेंडी हाेऊ नये; बाजारपेठा, अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी अपघात टळावेत
{सिग्नल यंत्रणा : वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतूक सुरळीत असावी, वर्दळीत अपघात हाेऊ नयेत.
{झेब्रा क्राॅसिंग : पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता अाेलांडता यावा, सिग्नलवर वाहने एका सरळ रेषेत उभी रहावीत.

बसस्थानके बनली मोफत पार्किंगचे ठिकाण
शहरातील अनेक बसस्थानकांची स्थिती अाजघडीला मोफत पार्किंग ठिकाणांसारखी बनली आहे. बसस्थानक परिसरात खासगी वाहने उभी करण्याचा नियम असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलेे जात अाहे. या ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावलेले असतानाही त्याची अंमलबजावणी हाेत नसल्याने ते केवळ शोभेपुरतेच असल्याचे दिसते.बसस्थानक परिसरात सर्रासपणे खासगी दुचाकी वा चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहनधारक बसचालकांमध्ये वाद हाेण्याचे प्रकारही घडतात. याबाबत एसटी प्रशासनाने वाहतूक शाखेकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात अाले.

वाहनचालकांना दिसेनासा झाला ‘झेब्रा पट्टा’...
सिग्नलवर पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता अाेलांडता यावा, यासाठी मारण्यात अालेल्या ‘झेब्रा क्राॅसिंग’कडे वाहनचालक साेयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून अाले. झेब्रा क्राॅसिंगच्याही पुढे वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अाेलांडणाऱ्या नागरिकांना जीव धाेक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. यामुळे अपघाताची शक्यताही बळावते. वाहतूक पाेलिसांनी जातीने लक्ष घालून अशा वाहनधारकांचे प्रबाेधन करण्याची गरज व्यक्त हाेत अाहे.

‘टाइमर’कडे दुर्लक्ष...
शहरातील बहुतेक सिग्नलवर वाहनधारकांच्या सुविधेसाठी टाइमर बसविण्यात आले अाहे. या टाइमरद्वारे वाहनचालकांना सिग्नल किती वेळात रेड वा ग्रीन होणार हे दिसत असते. मात्र, अनेकदा बेशिस्त वाहनधारक वाहतूक पाेलिस गैरहजर असल्याचे बघून या टाइमरकडे दुर्लक्ष करून सर्रास नियम पायदळी तुडवत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून आले आहे. परिणामी, या प्रकारामुळे वाहतूक कोंडी तर हाेतेच, मात्र सिग्नलच्या नियमांचे पालन करणाऱ्यांवर अपघाताचे संकट अाेढावण्याची शक्यता निर्माण हाेते. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मागणी हाेत अाहे.
रमाकांत महिरे, सहायकपाेलिस अायुक्त, वाहतूक शाखा

पोलिसांनी शिस्त लावणे गरजेचे...
^शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. द्वारका परिसरातील वाहतुकीचा प्रश्न प्राधान्याने साेडविणे गरजेचे बनले अाहे. -संदीप सोनवणे, नागरिक.
थेट प्रश्न
वाढत्या वाहतूक संख्येच्या तुलनेत नियाेजनात कमी पडत असलेल्या पाेलिस प्रशासनाकडून केवळ चिरीमिरीच्या कारवाईपलीकडे ठाेस उपाययाेजना हाेत नसल्याचे दिसून येत अाहे. बंद सिग्नल यंत्रणा, वाहतूक पाेलिसांची गैरहजेरी, एकेरी मार्गात घुसखाेरी, झेब्रा क्राॅसिंग, नाे पार्किंग अशा नियमांची सर्रासपणे हाेणारी पायमल्ली यामुळे अाजघडीला शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले अाहेत. मात्र, पाेलिस यंत्रणा अपुऱ्या मनुष्यबळाचे रडगाणे गात यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने दिवसेंदिवस अपघातांची संख्या मात्र वाढू लागली अाहे. वाहतूक पाेलिसांच्या उदासीन कारभारावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
वाहतूक नियमांचे वाहनचालकांना वावडे, पाेलिस प्रशासनाकडून नियमित कारवाई हाेत नसल्याने वारंवार काेंडीची समस्या; वाहतूक पाेलिसांच्या गैरहजेरीमुळे सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्राॅसिंग, एकेरी मार्गाचे नियम बसवले जाताहेत धाब्यावर
सिंहस्थात रस्ते झाले प्रशस्त मात्र, वाहतूक काेंडीची समस्या अाजही कायम; अपघातांची संख्याही वाढली
{ शहरात अनेक ठिकाणी वाहनधारक सिग्नलच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे. वाहतूक काेंडीला जबाबदार ठरणाऱ्या या प्रकाराबाबत काय ठाेस उपाययाेजना करणार?
-वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांच्या विरोधात कारवाई सुरूच असते. ज्या वाहनधारकांकडून नियमांचा भंग केला जाताे, त्यांच्यावर कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
{बहुतांश वेळेस सिग्नलवर वाहतूक पोलिस हजर नसल्याचे दिसून येते. काय कारण?
-वाहतूक शाखेत मनुष्यबळाची कमी असल्याने अनेकदा अडचणी येतात. वाहतूक नियंत्रणासाठी त्या-त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी थांबणे बंधनकारक आहे. याची खबरदारी घेतली जाईल.
{द्वारका परिसरातील समांतर रस्त्यावरील वाहतुकीचे काय?
-या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी येथील समांतर रस्त्यावरून एकेरी वाहतुकीची अधिसूचना काढण्यात आली आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असून, तात्पुरते या ठिकाणी फलकही लावण्यात अाले आहेत.
{एकेरी मार्गातील घुसखाेरीबाबत काय कारवाई करणार?
-एकेरी मार्गात प्रवेश करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाते. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील.
बातम्या आणखी आहेत...