आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅफिक पार्कमध्ये घ्या माेठ्यांची शिकवणी, "नाशिक फर्स्ट'ला कानमंत्र आणि चिमटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय याेजायचे असतील तर लहानांबराेबरच माेठ्यांनाही नियम शिकवावे लागतील. त्यादृष्टीने नाशिक फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी शिकवणीची व्यवस्था करावी, अशा कानपिचक्या देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाशिक माॅडेलचा गजर केला. नाशिकमध्ये जे प्रकल्प हाेतील ते संपूर्ण भारतात नसतील काेणीतरी एक उदाहरण निर्माण करावे त्याचे अनुकरण संपूर्ण देशाने करावे असेच काम हाेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कचे उद‌्घाटन शनिवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी पाेलिस महासंचालक पी. एस. पसरीचा, महिंद्रा कंपनीचे राजीव दुबे, लॉर्ड कंपनीचे विलास ढवळे, नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी, महापाैर अशाेक मुर्तडक, अामदार देवयानी फरांदे, उपमहापाैर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, नगरसेविका सुजाता डेरे, सुनीता माेटकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

वाहतूक समस्येवरील वास्तव मांडताना ठाकरे यांनी पुण्यातील रिक्षावाल्याने वळण घेण्यासाठी चक्क पाय बाहेर काढून केलेल्या खुणेची नक्कल करून दाखवत माेठ्यांनाही वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्याची कशी गरज अाहे, याकडे लक्ष वेधले. नाशिकमध्ये मनसेकडून चांगले काम हाेत असल्याचे सांगत येत्या वर्षभरात शहराचा चेहरामाेहरा पालटेल, असा विश्वासही व्यक्त केला.
चांगले काम करण्यासाठी नाशिककरांच्या पाठबळाची गरज असून, चांगले काम हाेत असल्यामुळेच माेठे उद्याेजक सीएसअार अॅक्टिव्हिटीतून नाशिकची निवड करत असल्याचे सांगितले. उड्डाणपुलाखालील जागेचा कशा पद्धतीने चांगला वापर हाेऊ शकताे याचाही अादर्श नाशिकच निर्माण करेल, असा दावाही त्यांनी केला.

शंभर फुटी कारंजे
गाेदावरीत शंभर फूट उंच उडतील, असे दाेन जिनेव्हा फाऊंटन, पुलांवर वाॅटर कर्टन्स असे अनेक प्रकल्प हाेतील. हे मतांसाठी करत नसून नाशिककरांनी चांगल्या कामाला हातभार लावण्यासाठी पुढे यावे, असे अावाहनही ठाकरे यांनी केले.

नाशिक फर्स्ट अायाेजित या कार्यक्रमाला प्रारंभापासूनच वादाचे ग्रहण लागले. तीन एकर जागा दिली असताना पालिकेचा काेठेही उल्लेख नसल्याचे बघून सर्वप्रथम अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनीच कानउघाडणी केली. व्यासपीठावर उपमहापाैर स्थायी समिती सभापती यांना खुर्ची नसल्यामुळे चांगलीच धावपळ झाली. कसेबसे महापालिकेचे चिन्ह असलेल्या घंटेची प्रतिकृती पडद्यावर लावून वेळ निभावून नेण्यात आली. त्यात प्रमुख पाहुण्यांचा लांबलचक परिचय श्राेत्यांची भीडभाड ठेवता लांबलचक संदर्भहीन भाषणे हाेऊ लागल्यामुळे खुद्द राज त्रस्त झाले. त्यातून त्यांनी अचानक व्यासपीठ साेडल्याने एकच गहजब झाला. ठाकरे कार्यक्रम साेडून जातात की काय, अशीही शंका उपस्थित करत मनसे पदाधिकाऱ्यांची धावपळ झाली. दरम्यान, ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नाशिक फर्स्टला कानपिचक्या देत हा प्रकल्प करण्यात पालिकाच फर्स्ट असल्याचा चिमटा घेतला. मनपाने जागा दिली नसती तर पुढे काहीच झाले नसते, असे सांगत येथील सर्व इंग्रजी फलक बदलून मराठीत नियमावली करा, असेही सुनावले. काॅस्माेपाॅलिटन रूपडे करू नका, असे सांगतानाच त्यांनी चिल्ड्रन पार्कमध्ये टाेलनाका का बसवला नाही, असा सवाल करत मिश्किलीही केली.