आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाने कंटेनर अंगावर घातल्याने वाहतूक पोलिस ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - मुंबई-नाशिक महामार्गावर पाथर्डी फाटा येथे वाहनांची तपासणी सुरू असताना कंटेनर चालकास थांबण्यास सांगितले असता, चालकाने थेट वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर कंटेनर नेत त्यास धडक दिली. यामध्ये डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने कर्मचारी उपचारादरम्यान ठार झाला. घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला.
याबाबतचा घटनाक्रम असा, रविवारी दुपारी २.३० ते वाजेच्या दरम्यान वाहतूक पोलिस वाहनांची तपासणी करत हाेते. पोलिस निरीक्षक सुरेश भाले, कर्मचारी ए. डी. आवारे नानाभाऊ बागूल हे कर्तव्य बजावत होते. याचवेळी मुंबईकडून नाशिककडे भरधाव वेगात येणारा कंटेनर (एमएच ०४, जीसी ५८७५) संशयास्पद वाटल्याने नानाभाऊ बागूल यांनी कंटेनरचालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, कंटेनरचालकाला त्याचा राग आल्याने त्याने तो थेट बागूल यांच्या अंगावर घातला. बागूल हे कंटेनर समोर धडकले गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्राव झाला. हा प्रकार पाहून आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावले. बागूल यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. कंटेनरचालकाचे नाव मधुकर वाकडे असल्याचे समजते. तो पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

पाच दिवसांपूर्वीच स्वीकारला होता पदभार : बागूलहे सातपूर पोलिस ठाण्यात कार्यरत हाेते. त्यांची बदली वाहतूक शाखेत होऊन पाच दिवसांपूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. रुजू होताच त्यांनी बेशिस्त रिक्षाचालक, विना कागदपत्रे दुचाकीचालक यांना शिस्त लावण्यास सुरुवात केली होती. रविवारी आपले कर्तव्य बजावत असताना बेशिस्त कंटेनरचालकाने थेट त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा जीव घेतला. एका चांगल्या कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावत असताना आपले प्राण गमवावे लागल्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

शांत स्वभावाचा पाेलिस कर्मचारी
शांत स्वभावाचे बागूल हे सातपूर पाेलिस ठाण्यात कार्यरत हाेते. काही दिवसांपूर्वी त्यांची वाहतूक शाखेत बदली झाली हाेती. त्यांचे मूळ गाव फणशीपाडा (ता. कळवण) असून, काही वर्षांपूर्वी ते नाशकात स्थायिक झाले हाेते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई आहे. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहे.

अधिकाऱ्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन
हवालदार नानाभाऊ बागूल (बक्कल नंबर ३५५) यांच्या अपघाताचे वृत्त समजताच पोलिस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अतुल झेंडे, महिरे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, मनोज करंजे, डॉ. सीताराम कोल्हे, वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बागूल यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

बातम्या आणखी आहेत...