आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतुकीला शिस्त लावणे दूर, दंड वसुली करण्यावर मात्र भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वाढत्या लोकसंख्येमुळे नाशिक शहरातील वाहनांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. वाहनचालकांना शिस्त लावण्याचे आद्यकर्तव्य सोडून वाहतूक पोलिस दंड वसुलीतच व्यग्र असल्याचे चित्र आहे.

शहराची लोकसंख्या 16 लाख, त्याच्या निम्मी जवळपास आठ लाख वाहनांचा रस्त्यावर राबता, वाहतूक नियोजनासाठी जेमतेम 200 पोलिस, अशी नेहमीच होणारी ओरड. राज्य शासनाने महसूल वसुलीसाठी विशिष्ट उद्दिष्ट दिले नसताना वाहतूक पोलिस वाहनचालकांच्या मागे दंडुकाच घेऊन लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मुख्य चौकांत बेशिस्त वाहने हाकणार्‍यांवर कारवाई करण्यापेक्षा गल्लीबोळात नाकेबंदी करीत दंड वसुलीवरच भर दिला जात आहे. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लावू असे जाहीरपणे सांगितले होते. त्यानुसार गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात लूटमार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल एक हजाराने घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मात्र, वाहतुकीचा खेळखंडोबा दूर करण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. दंड वसुलीमुळे वाहनचालकांत संताप व्यक्त होत आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाचा अपवाद वगळता विविध वाहनांच्या चालकांना एकत्रित मार्गदर्शन केल्याचे खुद्द वाहतूक पोलिसांच्याच स्मरणात नाही. याउलट, दररोज सरासरी 250 दुचाकीचालक, 50 रिक्षा, 10 ते 20 कार अशा वाहनांवर कारवाई करून सुमारे 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो.

वर्षभरातील कारवाई
जानेवारी ते डिसेंबर 12- एक लाख 52 हजार 313 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे एक कोटी 83 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये केवळ 381 मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये 15 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर गेल्या दोन महिन्यांत 21 हजार वाहनांवर कारवाई करीत सुमारे 23 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई कागदावर असून, प्रत्यक्षात वाहनधारकांकडून विनापावतीचाच दंड वसूल केला जात असल्याचे बोलले जात आहे.

नियमांचे उल्लंघन
मायको सर्कल चौक, सिटी सेंटर मॉल, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक, कॉलेजरोड, डॉन बॉस्को स्कूल रस्ता, पारिजातनगर, त्र्यंबक नाका, सीबीएस चौक व महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी फौजफाटा घेऊन तपासणी मोहीम राबवितात. मायको सर्कलवरील उदाहरण घेतले असता, तपासणी सुरू असताना दुसरीकडे प्रवेश बंद मार्गाने वाहनधारक होलाराम कॉलनीकडे निघून जातात.