आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पोलिसांचे दुचाकीस्वारच झाले ‘लक्ष्य’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बेशिस्त वाहनचालक वाहतूक पोलिसांना उघड आव्हान देत असताना केवळ दुचाकीस्वारांना लक्ष्य करीत भाऊ, दादा, नानांच्या कारमधून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडे पोलिस डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करीत केवळ दंड ‘वसुली’च त्यांचे ध्येय आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी गुन्हेगारी नियंत्रणाबरोबरच वाहतूक शिस्तीला प्रारंभी प्राधान्य दिले. गुन्हेगारी नियंत्रणात काहीसे यश येत असले तरी वाहतुकीवर नियंत्रणावर पूर्णत: अपयश आल्याचे पदोपदी दिसून येत आहे.

उपायुक्तांच्या मार्गदर्शानाखाली सहायक आयुक्त, तीन वरिष्ठ निरीक्षक, दहा ते पंधरा सहायक, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि किमान 180 पोलिसांचा ताफा कार्यरत आहे. एमजी रोड, मेहेर चौक, अशोकस्तंभ, विद्याविकास सर्कल, प्रसाद मंगल कार्यालय, डॉन बॉस्को स्कूल, कॉलेजरोड, येवलेकर मळा, टिळकवाडी, मायको सर्कल, महात्मानगर येथे दिवसभरात केवळ दोन दोन तास वाहतूक पोलिस दिसतात.

या भागात कारचालक रस्त्यातच वाहने उभी करतात. त्यामुळे दोन्ही बाजूस कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा दिसतात. परंतू, ही वाहने बाजूला काढून वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल करण्याचे धाडस पोलिस करत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याऐवजी नाकेबंदी, वाहनतपसाणीच्या नावाखाली वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी आठ-आठ, दहा-दहा कर्मचार्‍यांना सोबत घेऊन लाखोंचा दंड वसूल करताना आढळतात.

दुचाकीच्या तुलनेत निम्म्याच चारचाकींवर कारवाई

गेल्या वर्षभरात शहरातील सुमारे 1 लाख 53 हजार वाहनांवर कारवाई करीत 1 कोटी 84 लाखांचा दंड वसूल केला. त्यात सर्वांधिक 67 हजार 840 दुचाकींचा समावेश आहे. त्यांच्याकडून 76 लाख 75 हजारांचा दंड मिळाला.

या कारवाईत केवळ 28 हजार कार, मोटारींवर दंडात्मक कारवाई करून 31 लाखांचा दंड वसूल केला. गेल्या तीन महिन्यांत 30 ते 31 हजार दुचाकींवर कारवाई करण्यात आली असून 31 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.