आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहो, ‘खा की!’: वाहतूकीची कोंडी, पोलिसांची चांदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात पोलिसांकडून मोहीम राबविली जात असल्याने नागरिकांनी स्वागत केले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडून त्यास ‘वसुली’चे वळण मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषत: शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी उंटवाडीरोड, दत्तमंदिर, पवननगर, मायको सर्कल, गडकरी चौक, सोमेश्वर, आनंदवल्ली, तपोवन भागात हे चित्र दिसून येते.
पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी हाती घेतलेल्या नाकेबंदी, वाहने तपासणीबरोबर कोम्बिंग ऑपरेशनच्या पाठोपाठ वाहतूक पोलिसांच्या कामातही बदल केले आहेत. सुरुवातीला सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दिसणार्‍या वाहतूक पोलिसांचे मात्र आता किमान 18 ते 20 तास दर्शन घडत असते. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि रस्त्यावरच वाहन उभे करणार्‍यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, काही दिवसांपासून वाहतूक शाखेच्या वरिष्ठांसमवेत वाहने तपासणीच्या नावाखाली पूर्वीसारखेच चित्र दिसून येत आहे.
शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी विशेषत: सिडको-सातपूर भागात कामगार वस्ती असल्याने मोठय़ा संख्येने कुटुंबीय दुपारनंतर खरेदीसाठी बाहेत पडतात. याच कालावधीत पवननगर भाजीमार्केट, त्रिमूर्तीचौक मार्केट, दिव्या अँडलॅब थिएटरसमोर, तसेच संभाजी चौक, उंटवाडी रस्ता या भागात रस्त्यावरच विक्रेते ठाण मांडून बसतात. रस्त्यातच वाहने उभी करून तासन् तास टोळके गप्पा मारत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडत असतात. याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करीत असून, वाहने तपासणीच्या कामालाच प्राधान्य दिले जात आहे.
मुळात आयुक्त, उपायुक्तांनी वारंवार विना नंबर प्लेट, थ्री-सीट, भरधाव वेगाने वाहने चालविणार्‍यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्याकडे डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मोबाइलवर बोलत कार चालविणार्‍यांवर कारवाई न करता केवळ दुचाकींवरच कारवाई होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सिडकोप्रमाणेच सोमेश्वर येथे जाणार्‍या युवकांच्या दुचाकी, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे योग्य असले, तरी इतर राज्यातून येणार्‍या भाविकांची हेतूत: अडवणूक करण्यासारखे प्रकारही घडत आहेत. कागदपत्रे असतानाही त्याकडे ‘पावती’ फाडण्याचा आग्रह होतो. याबाबत वरिष्ठांकडून दखल घेण्याची मागणी होत आहे.