आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक शहरातील वाहतूक बेटांच्या व्यापाचा ताप होणार कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील वाहतूक बेटांच्या मोठय़ा आकारामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने या बेटांचा आकार कमी करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्तालयाने महापालिकेकडे पुन्हा एकदा सादर केला आहे. प्रमुख चौकातील वाहतूक बेटांमुळे होणार्‍या अपघातांसंदर्भात ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची पोलिसांनी दखल घेतल्यानंतर महापालिकेनेही कार्यवाही करण्याची तयारी दर्शवली आहे. पोलिसांनी तीन ठिकाणी उड्डाणपुलांचाही प्रस्ताव ठेवला आहे.

रविवार कारंजा चौकात वाहतूक कोंडीत बसचालकाच्या धक्क्याने वाहतूक बेटाजवळ अडकून एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरातील प्रमुख चौकांत बेशिस्त रिक्षाचालकांसह रस्त्यातच उभ्या राहणार्‍या अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातच बसचालकांना वळण घेण्यासाठी कराव्या लागणार्‍या कसरतीवर वृत्तमालिकेतून प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्यानंतर पोलिस उपआयुक्त नंदकुमार चौगुले यांनी वाहतूक बेटांचा विस्तार कमी करण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा महापालिकेकडे सादर केला आहे. तसेच, पालिका अधिकार्‍यांना वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. तीन ठिकाणी उड्डाणपूल, सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक बेटांचा आकार कमी करण्याचे मुद्दे प्रस्तावात आहेत. त्यास महापालिकेकडून मंजुरी मिळाली असून, महिनाभरात प्रत्यक्ष कार्यवाही होण्याची शक्यता चौगुले यांनी वर्तवली आहे.

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून तत्कालीन पोलिस उपआयुक्त सुनील फुलारी यांच्यापाठोपाठ उपआयुक्त चौगुले यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे प्रत्यक्षात कृती होत नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचा आरोपही वाहतूक पोलिसांनी केला.


असे सुचवले उपाय
> सारडा सर्कल येथे उड्डाणपूल अथवा स्कायवॉकचा प्रस्ताव असून, तत्पूर्वी चौकाचा आकार कमी करावा.
> अशोकस्तंभ चौक, मायको व महिंद्रा सर्कल, जेहान सर्कलवरील वाहतूक बेटांचा आकार कमी करावा.
> मायको सर्कल येथे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर असला तरी कार्यवाहीची प्रतीक्षा.