आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या सभेमुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत आज बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी (दि. ५) पंचवटी परिसरात होणाऱ्या सभेकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाकडून शहरात येणाऱ्या प्रमुख वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी दोन वाजेपासून वाहतूक बदलाचे खालीलप्रमाणे निर्बंध लागू होणार आहेत
दिंडोरीरोडकडून येणारी वाहतूक : वणी, दिंडोरी, कळवण, पेठ, ननाशी व नाशिक शहरातील पंचवटी भागातील नागरिकांना दिंडोरी नाका, काट्या मारुती, संतोष टी पॉइंट येथे आल्यानंतर पंचवटी, तपोवन क्रॉसिंग रोडने आठवण लॉन्स-लक्ष्मीनारायण मंदिर-तपोवन नर्सरी रोडमार्गे सभेच्या ठिकाणी जाता येईल.
मुंबईकडून येणारी वाहतूक : मुंबई, इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, त्र्यंबक, जव्हार मोखाडा, अंबड, सिडको व भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतून सभेसाठी येणारी वाहने मुंबई-आग्रारोडने जुना मुंबई नाका, द्वारका सर्कल, टाकळी फाटा येथून उजवीकडे वळून तिगरानिया कंपनी रोडने जुना सायखेडारोड, मारुती वेफर्स,
लक्ष्मीनारायण पुलावरून बुटूक हनुमान मैदानावर वाहने पार्क करून सभेच्या ठिकाणी पायी जाता येईल.
पुणेरोडकडून येणारी वाहतूक : पुणे, अहमदनगर, शिर्डी, संगमनेर, सिन्नर, पळसे, एकलहरे, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूर, उपनगर या भागाकडून येणारी वाहने ‘फेम’ थिएटरजवळून उजवीकडे वळून जयशंकर गार्डनमार्गे मारुती वेफर्स, लक्ष्मीनारायण पूल, तपोवन चौकमार्गे जातील. वाहन पार्किंगच्या जवळून सभेच्या ठिकाणी पायी जाता येईल.
औरंगाबादरोडवरून येणारी वाहतूक : येवला, लासलगाव, निफाड, विंचूर, चांदोरी, सायखेडा, चेहडी, ओढा, लाखलगाव, शिलापूरकडून येणारी वाहने औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागमार्गे जयशंकर गार्डन
फेस्टिव्हल, जेजूरकर मळा या ठिकाणी पार्क करता येतील. तेथून सभेच्या ठिकाणी
पायी जाता येईल.
धुळे-मालेगावकडून येणारी वाहतूक : चांदवड, सटाणा, देवळा, पिंपळगाव बसवंत, ओझर या भागातून सभेसाठी येणारी वाहने हॉटेल जत्रा येथून डावीकडे वळून नांदूर नाका, निलगिरी बाग, जेजूरकर मळा या ठिकाणी पार्क करता येतील.
दरम्यान, मुंबई-आग्रारोड-धुळे, मालेगाव या भागातून येणारी सर्व वाहने स्वामीनारायण मंदिराकडे सर्व्हिसरोडने न येता ती उड्डाणपुलावरून द्वारका येथे रॅम्पवरून खाली येतील व मुंबईकडे जाणारी वाहने ही उड्डाणपुलावरून मुंबईकडे जातील. मुंबई बाजूकडून येणारी वाहने उड्डाणपुलावरून के. के. वाघ महाविद्यालय येथे उतरून धुळ्याकडे जातील. मुंबईकडून औरंगाबादरोडकडे जाणारी वाहने द्वारकामार्गे बिटको चौक, जेलरोडने नांदूर नाकामार्गे औरंगाबादकडे जातील.
दुपारी दोनपासून निर्बंध
पंतप्रधान मोदींची सभा सायंकाळी सात वाजता सुरू होणे अपेक्षित आहे. वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता दुपारी दोन वाजेपासून हे निर्बंध लागू होतील.
पार्किंगबाबत साशंकता
सभेकरिता किमान दोन लाख लोक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या तुलनेत वाहनांची संख्यादेखील वाढणार आहे. मात्र,संभाव्य पार्किंगची जागा कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.