अक्षरश: कोंबड्यांप्रमाणे वाहनांमध्ये कोंबलेले वऱ्हाडी आणि हेलकावे खात चालत असलेली वाहने शहरातील रस्त्यांवर सध्या सर्रासपणे दिसत आहे. माल वाहतुकीचाच परवाना असलेल्या ट्रकमधून अशा प्रकारची माणसांची वाहतूक नियमाने करताच येत नाही. परंतु, या नियमाला धाब्यावर बसवत शहरात बिनदिक्कतपणे माणसांची वाहतूक ट्रक्स, जीप आणि अन्य चारचाकी वाहनांमधून सुरू आहे. या वाहनांकडे वाहतूक पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व प्रकाराबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग वाहतूक पोलिसांना काही सोयरसुतकच नाही. एखाद्या फाट्यावर किंवा चौकामध्ये थोडीशी "चिरीमिरी' दिली की कितीही प्रवासी असले तरीही वऱ्हाडाचा पुढचा जीवघेणा प्रवास सुरू होतो. या गंभीर प्रश्नांवर ‘डी.बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत.....
आयुष्यात मंगलमय क्षण समजला जातो तो विवाहाचा. या आनंदाच्या क्षणी जर एखादी दुर्घटना घडली तर आनंदावर विरजण पडते. ग्रामीण भागात लग्नसोहळा उत्सवाप्रमाणे साजरा होतो. येथील बहुतेक विवाह वर अथवा वधूच्या घरासमोर मांडव टाकून होतात. गावातील कोणाच्याही लग्नाला संपूर्ण गावाचे वऱ्हाड घेऊन जाण्याची प्रथा आहे. याचा खर्च अर्थातच लग्नघरावर असतो. यासाठी ग्रामीण भागात ट्रक किंवा टेम्पोचा वापर केला जातो. एकाच ट्रकमध्ये शंभर-सव्वाशे वऱ्हाडी कोंबलेले असतात. लग्नसराईत खासगी वाहनचालकांना तेजी असते. मात्र, याच खासगी वाहनांच्या अपघातात अनेकजण प्राणाला मुकल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. असे असतानाही प्रादेशिक परिवाहन विभाग वाहतूक पोलिस प्रशासनाच्या वतीने याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची धक्कादायक बाब ‘डी.बी. स्टार’समोर आली आहे.
थेट प्रश्न - अविनाश राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
- बेकायदेशिररित्या प्रवासीवाहतूक करणार्यांवर कारवाई का होत नाही?
अशा वाहनांवर विभागाच्या वतीने नेहमीच कारवाई सुरू असते.
- ट्रकच्या टपावरबसलेले, मागील बाजूस लोंबकळणारे प्रवासी , हे चित्र कसे बदलणार?
मोटरवाहन नियनानुसार कोणत्याही माल वाहतूक करणार्या वाहनाचा वापर प्रवासी घेवून जाण्यासाठी करता येत नाही. अशा वाहनांवर प्रादेशिक कडक कारवाई करणार.
- आरटीओकडून सातत्याने कडक कारवाई का होत नाही?
अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते.
ट्रकने मालाऐवजी प्रवासी
कोणत्याही ट्रकमधून प्रवासी वाहतुकीला कायदेशीर परवानगी नाही. ट्रकला माल वाहतुकीचाच परवाना दिला जातो. मात्र, लग्नसराईमध्ये या ट्रकमधून मालाऐवजी वऱ्हाडी मंडळींची वाहतूक केली जाते. शहरासह ग्रामीण भागामध्ये आजही बहुतांश वऱ्हाड हे ट्रकमधूनच जाताना दिसते. ट्रकच्या टपावर बसलेले, मागील बाजूस लोंबकळणारे आणि ट्रकमध्ये अक्षरशः कोंबलेले वऱ्हाडी पाहावयास मिळतात. वऱ्हाडाच्या वाहतुकीला ट्रक मिळवताना कोणत्याही अटी नसतात. प्रवाशांच्या संख्येचीही मर्यादा नसते. वाहतुकीचा दर हा अंतरावर ठरवला जातो. विशेष म्हणजे यासाठी अनामत रक्कमही घेतली जात नाही. त्यातच एसटीपेक्षा सुमारे ४० टक्के पैसे कमी घेतले जातात. या सर्व कारणांमुळे वधू-वरांकडील मंडळीही मालाऐवजी वऱ्हाडाची वाहतूक करायला सहजपणे तयार होतात.
एसटीचे परवडणारे दर
एसटी महामंडळातर्फे प्रासंगिक करारांतर्गत वऱ्हाडासाठी बस दिल्या जातात. त्यासाठी आठ दिवस आधी अनामत रक्कम भरून आरक्षण करावे लागते. साधी निमआराम बस या प्रकारात प्रति किलोमीटर दर आकारला जातो. मुक्कामाचा दर वेगळाच असतो. त्यातही ५० प्रवाशांचीच वाहतूक करता येते. वेळेचे बंधनही असतेच. वऱ्हाडासाठी गर्दी कमी हंगाम या दोन प्रकारात दर ठरतात. साध्या गाडीसाठी प्रति किलोमीटर ३२ ते ३४, निमआराम बससाठी ३१ ते ३५ रुपये दर आकारला जातो. हे दर सामान्यांना परवडत नाहीत. त्याचबरोबर प्रवाशांच्या संख्येलाही मर्यादा असल्याने एसटीला प्राधान्य देताना अडचणी येतात. त्यामुळे सुशिक्षित लोकच सध्या एसटीतून वऱ्हाडी वाहतुकीला पसंती देताना दिसतात.
एसटीपेक्षा लक्झरी बसला पसंती
वऱ्हाडी मंडळींची संख्या मर्यादित असल्यास प्राधान्याने खासगी लक्झरी बसचा विचार केला जातो. त्यातही शहरामध्ये अलीकडे अशा बसमधून वऱ्हाड नेणे हे प्रतिष्ठेचे झाले आहे. या सेवेचा दर जास्त असला तरीही एसटी बसपेक्षाही कमीच असतो. त्यातही प्रवाशांच्या संख्येमध्ये थोडीफार सवलत दिली जाते. ५०च्या जागी ६० प्रवासी असले तरी वाहतूक केली जाते. वऱ्हाडी मंडळींच्या दृष्टीने ही वाहतूक थोडीफार सुरक्षित दिसते. कारण तिला शिस्त आहे. त्याशिवाय अनुभवी चालकही असतात, तरीही ग्रामीण भागातील वऱ्हाड अपवादानेच खासगी लक्झरी बसमधून जाताना दिसते. त्यांचे ट्रकला जास्त प्राधान्य असते.
वऱ्हाडाच्या वाहनातच ताशे अन् बेंजो
वऱ्हाडाच्यावाहनातच ताशे, बेंजो, डीजे लावल्याने याच्या तालावर चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताच्या घटना घडतात. ग्रामीण भागातील प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एसटीसारखा स्वस्त, सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. सीटनुसार, अंतरानुसार एसटीचे पैसे आकारले जातात. ही वाहतूक अधिकृत, सुरक्षित असूनही ग्रामीण भागातील जनता याबद्दल उदासीनच आहे, ही स्थिती बदलणे अत्यावश्यक झाले आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे २०हजारहून अधिक विवाह होतात. त्यातील काही अपवाद वगळता बहुतांश विवाहाचे वऱ्हाड हे परगावी जाते. त्यामुळे वऱ्हाडाची वाहतूक करावीच लागते. अशा वेळी वधू-वरांकडील मंडळींपुढे दोनच पर्याय असतात, ते म्हणजे एस.टी. बस किंवा खासगी ट्रक, लक्झरी. अशा वेळी वऱ्हाडीसंख्या खर्चाचा विचार करून ट्रकमधूनच वाहतुकीला प्राधान्य दिले जाते. या निर्णयापासूनच वऱ्हाडाचा जीवघेणा प्रवास सुरू होतो.
ट्रकमधून वऱ्हाडी वाहतूक का?
- एस.टी.पेक्षा ४० टक्के कमी खर्च.
- एस.टी.चे अवास्तव दर.
- प्रवासी संख्येचे बंधन नाही.
- मुक्कामाचा अतिरिक्त चार्जही नाही.
- किलोमीटरपेक्षा अंदाजे भाडे आकारणी.
- अनामत रक्कम भरण्याची गरज नाही.
आरटीओ पोलिसांची "चिरीमिरी'
ट्रकमधून प्रवासी वाहतुकीला परवानगी नसताना वऱ्हाडाची वाहतूक होतेच कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्यात प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी पोलिस ठाणी आहेत, तरीही कसलीही कारवाई होता वऱ्हाडाचे ट्रक सगळे नियम धाब्यावर बसवत जागेवर पोहोचतात. लग्नाचा हंगाम आला की, वाहतूक पोलिसांची गस्त गावाबाहेरच्या फाट्यावर किंवा चौकात असतेच. वऱ्हाडाचा ट्रक आला की तो थांबवला जातो. थोडीफार चिरीमिरी दिली की ट्रक मार्गस्थ होतो. आरटीओ विभागाचीही तेच. फिरते पथक हे शोधतच असते. सापडले की तडजोड होते आणि वऱ्हाड लग्नाला पोचते. ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे तेच नियम धाब्यावर बसवून जीवघेण्या प्रवासाला पाठबळ देतात. जोपर्यंत अधिकारी कडक कारवाई करत नाहीत तोपर्यंत हा प्रवास असाच सुरू राहील.