नाशिक - वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका व महामार्ग रस्ते प्राधिकरणाकडे नव्याने 24 सिग्नल कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेने सादर केला आहे. यामध्ये सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून, लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, रस्त्यांची संख्या त्याप्रमाणात नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर उपाययोजनांसाठी वाहतूक पोलिसांनी योग्य ते नियोजन करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली. युवा मोर्चाचे अध्यक्ष गिरीश पालवे, सरचिटणीस व्हिनस वाणी, अजिंक्य साने, सचिन हांडगे, प्रसाद सानप, पवन पवार यांनी शिष्टमंडळाद्वारे वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त रमेश पाटील यांची भेट घेतली. यावर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून 24 ठिकाणी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव असून यामध्ये नागजी चौक (सह्याद्री हॉस्पिटल), स्वामीनारायण चौक (औरंगाबाद नाका), हॉटेल जत्रा, रासबिहारी टी पॉइंट, साईनाथ चौफुली, इंदिरानगर व वडाळानाका चौक येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून, लवकरच ती कार्यान्वित होणार आहे.
या ठिकाणी सिग्नल यंत्रणा प्रस्तावित
पाथर्डी फाटा, गरवारे पॉइंट, कॉलेजरोडवरील वॉलमार्ट चौक, बिग बझार, त्र्यंबकरोडवरील हॉटेल सिबल, जुना गंगापूरनाका, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर, जेलरोड पाण्याची टाकी, जेहान सर्कल, नांदूर नाका, महिंद्रा सर्कल (सातपूर), पाइपलाइन चौफुली (आनंदवली), उपनगर चौकी, के. के. वाघ महाविद्यालय, विडी कामगारनगर, लेखानगर, साईनाथ चौफुली, इंदिरानगर, डीकेनगर (निर्मला कॉन्व्हेंट), ड्रीमकॅसल बिल्डिंग (मखमलाबादरोड).