आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: वाहतुकीतही गैरव्यवहार: मुक्त विद्यापीठातील भांडाराचे सुरुवातीपासून अाॅडिटच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशात प्रथम क्रमांकावर विद्यापीठ पोहोचल्याचा दावा करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांचे  विद्यापीठाच्या स्थापनेपासून ऑडिटच झाला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पुस्तक छपाईत झालेला घोटाळा  कुलगुरू इ. वायुनंदन यांनी उघडकीस आणल्यानंतर पुस्तक भांडारात आग लागून सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले. तरी या पुस्तकांचे रेकॉर्ड लेखा विभागाकडे असणे गरजेचे असताना विद्यापीठातील काेणत्याही विभागाकडे ही माहिती नाही.

मुक्त विद्यापीठात संकेतस्थळापासून तर परीक्षा विभागापर्यंत भ्रष्टाचार उघडकीस अाल्यानंतर आता पुस्तक भांडारातही कोट्यवधींचा घोटाळा उघड येत आहे. विद्यापीठात ७ लाख ५० हजार विद्यार्थी असताना दरवर्षी तब्बल २२ लाख ५० हजार विद्यार्थ्यांच्या हिशेबाने पुस्तकांची बिले अदा केल्याचे प्रकार खुद्द कुलगुरूंनीच उघडकीस आणल्यानंतर या विभागातील रेकॉर्ड जाळण्याचा प्रकार समोर आला. भांडार विभागातील रेकॉर्ड जळाले म्हणजे संपूर्ण रेकाॅर्ड नष्ट हाेत नाही. प्रत्येक विभागाला किती पैसे अदा केले गेले तसेच त्याचे संपूर्ण ऑडिट रिपॉर्टही लेखा विभागाकडे असतात. मात्र, विद्यापीठाच्या भांडार विभागाचे विद्यापीठाच्या स्थापनेपासून म्हणजे २८ वर्षापासून पुस्तकांचे ऑडिट झाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

पुस्तक वाहतुकीच्या खर्चातही गैरव्यवहार
विद्यापीठाच्या भांडार विभागामार्फत पुस्तक सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी केल्या जाणाऱ्या खर्चातही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. नाशिकहून पुण्याकडे पुस्तके पोहोचविण्यासाठी पाठवताना नाशिक रोड, सिन्नर,संगमनेर, नारायणगाव, मंसर, राजगुरुनगर, चाकण, भोसरी आणि शिवाजीनगर या मार्गावर एकाच वेळी एकाच वाहतुकीमार्फत सर्व पुस्तके पोहोचविणे गरजेचे असताना या संपूर्ण मार्गावर वाहतूक पुन्हा नाशिकला आणल्याचे दाखवत पैसे उकळण्यात आल्याचे समोर आले. संपूर्ण राज्यभराच्या मार्गावर दाखविण्यात आल्याचे चौकशीत दिसून आले आहे.   
 
चौकशी करणार..  
भांडार विभागातील एक-एक पुस्तकाची माहिती घेतली जाणार आहे. जोपर्यंत मागील पुस्तकांची माहिती मिळणार नाही, नवीन पुस्तकांसाठी यंदा खर्च केला जाणार नाही. विद्यापीठातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल.  
- ई.वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  

अंदाज घेऊनच पुस्तके तयार हाेतात..  
विद्यापीठाच्या पुस्तक भांडाराजवळ आग लागली होती. त्यात बिनकामाचे पेपर जळाले, त्यात महत्त्वाचे रेकाॅर्ड नव्हते.  पुस्तकांचे रेकॉर्ड भांडार विभागाकडून ठेवले जात आहे. त्याचे ऑडिटही केले जाते. मात्र, पुस्तके तयार करताना अंदाजप्रमाणेच पुस्तके तयार केली जातात की पुढच्या वर्षी किती विद्यार्थ्यांना पुस्तके लागतील.  
- अनिल थोरात, भांडार प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...