आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trai Order : Within Two Days Cable Package Possible

ट्रायच्या आदेशामुळे दोन दिवसांत केबलचे पॅकेज शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एमएसओ (मल्टीसिस्टिम ऑपरेटर) आणि डीटीएच कंपन्यांसोबत 15 एप्रिलपूर्वी करार करण्याचे आदेश ‘ट्राय’ने ब्रॉडकास्टर्सला दिल्याने मंगळवारपर्यंत स्थानिक केबलचेही पॅकेज जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केबल डिजिटलायझेशनची 31 मार्च ही अंतिम मुदत संपल्यानंतरही एमएसओ आणि डीटीएच कंपन्यांसोबत ब्रॉडकास्टर्सचे करार झालेले नाहीत. त्यामुळे केबल ग्राहकांना द्यावयाचे दर महिन्याचे पॅकेज एमएसओंना जाहीर करता येत नाही. तसेच, ग्राहकांना किती दर आकारायचे, याबाबत संभ्रम असल्याने एमएसओंसह ग्राहकही दर महिन्याच्या आकारणीबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. त्याचा फायदा घेत केबलचालक ग्राहकांकडून अधिक मासिक आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्वरित करार करण्याचे आदेश ‘ट्राय’ने (टेलिकॉम रेग्युलॅरेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) ब्रॉडकास्टर्सला दिले आहेत. मात्र, अद्याप सर्व ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसविलेले नाहीत. एमएसओही सेट टॉप बॉक्स बसवल्याबाबत माहिती जाहीर करत नाहीत. करमणूक कर विभागास केवळ तोंडीच दिलेल्या तपशिलाच्या आधारावर त्यांच्यासोबत करार करण्यास ब्रॉडकास्टर्स धजत नसल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, आता सोमवारच्या मुदतीपूर्वीच या सर्व यंत्रणांना आपापसांत करार करण्यासह ग्राहकांसाठी पॅकेज जाहीर करावे लागणार आहे.


केबलदर वाढले, आणखी वाढण्याची शक्यता
शहरातील एक लाख 62 हजार (सुमारे 80 टक्के) ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसविल्याचे एमएसओंनी प्रशासनास सांगितले आहे. त्यानुसार, अद्यापही 20 टक्के बॉक्स बसविणे बाकी असल्याने या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एमएसओंनी पॅकेज दर जाहीर करणे लांबणीवर टाकले आहे. परंतु, 100 रुपयांपासून पुढे पॅकेज ठेवण्याचे केबल कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, डीटीएच कंपन्यांनीही रिचार्जचे दर वाढविले असून, किमान 160 रुपयांऐवजी 180 ते 220 रुपयांपर्यंत दर निश्चित केले आहे. तसेच, त्यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे.

संबंधित यंत्रणांना आदेश
शहरात जवळपास 80 टक्क्यांहून अधिक सेटटॉप बसविण्यात आले आहेत. आम्ही एमएसओंना त्यांची ग्राहक संख्या कळविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ब्रॉडकास्टर्सलाही शासनाने करार करण्याची मुदत 15 एप्रिल ही दिली आहे. नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी, प्रशासन

मगच पॅकेज जाहीर
अद्याप आमचे पॅकेजसंदर्भातील नियोजन वरिष्ठ स्तरावरूनच जाहीर झाले नसल्याने ते ग्राहकांना सांगता येणार नाही. ब्रॉडकास्टर्ससोबत करार झाल्यानंतरच विविध पॅकेज जाहीर करता येतील. दिलीप सानप, वरिष्ठ व्यवस्थापक, हाथवे केबल कंपनी


साराच गोंधळ आहे..
सेट टॉप बॉक्स बसवण्याचा निर्णय अंती ग्राहकांच्या हिताचाच असला तरी यासंदर्भात सुरुवातीपासूनच मोठी गोंधळाची स्थिती आहे. आता करार ठरल्याप्रमाणे लवकर व्हावा. अतुल चौधरी, ग्राहक