आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींना मोफत स्वसंरक्षणाचे धडे, कळवण येथील उपक्रमाचे महिलावर्गातून स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळवण - कळवणनगरपंचायतच्या महिला नगराध्यक्षासह नगरसेविकांनी नगरपंचायतच्या महीला बाल कल्याण समितीच्या पुढाकारातून शहरातील विद्यार्थिनिंना मोफत स्वसंरक्षणाचे धडे स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून देण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमाचे मुलींनी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन स्वागत केले आहे.
 
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिलांचे स्वसंरक्षण हा विषय ऐरणीवर आला. शासकीय पातळीवर याबाबत निर्णय देखील झाले. मुलींना ज्युदो-कराटेचे प्रशिक्षण देण्याचे आदेश निघाले आणि ते आदेश लालफितीत अडकले. मात्र कळवण नगरपंचायतने याबाबत पुढाकार घेऊन शहरातील माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणाचे मोफत धडे देण्यासाठी महीनाभराचे ज्युडो- कराटे प्रशिक्षण कळवण शहरातील जानकाई विद्यालयात आयोजित केले आहे. महिनाभरात जास्तीत जास्त मुलींना कमीत कमी किंवा जवळील उपलब्ध साधनांत कशा पद्धतीने स्वसंरक्षण करता येईल, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या शिबीराचे उदघाटन आर. के. एम. माध्यमिक विद्यालयात कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड शशिकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, नगरसेविका अनिता जैन , भाग्यश्री पगार, रोहिणी महाले , सुरेखा जगताप, नगरसेवक साहेबराव पगार, मनोज देवरे , मुख्याधिकारी डाॅ सचिन पटेल, प्राचार्य एन. पी. पवार, डी. बी. पाटील, यु. एस. पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटनप्रसंगी बोलतांना अॅड शशिकांत पवार म्हणाले की, मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिर काळाजी गरज असून शहरी भागातील परिस्थिती ही दिवसेंदिवस बिघडत चालली असून सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. काळाची गरज ओळखून कळवण नगरपंचायतने मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करुन कौतुकास पात्र ठरण्याचे काम केले आहे.
 
शहरात दिवसेंदिवस मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे दिसून येते. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने मुलींना सक्षम बनवण्याची गरज आहे. याचा विचार करून कळवण नगरपंचायतने विद्यार्थिनिंना स्वसंरक्षण करता यावे, यासाठी ज्युडो, कराटेचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका अनिता जैन यांनी यावेळी केले. यावेळी मुख्याधिकारी डाॅ सचीन पटेल यांनी नगरपंचायतीच्या कामकाजाची माहीती देऊन स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात मुलींना सहभागी होण्याचे आवाहन केले.
 
कार्यक्रमास उपप्राचार्य डी. बी. पाटील, डी. जे. पवार , किशोर पगार ,प्रशिक्षक हनुमंते, अमोल आहेर. योगेश पगार, सूर्यवंशी आदींसह प्रशिक्षणार्थी मुली उपस्थित होत्या. सूत्रसंचलन आभार पी. एम. महाडीक यांनी मानले.
 
मुलीं सक्षम व्हाव्यात
अत्याचाराविरोधात लढण्यासाठी सर्वत्र चळवळी सुरू झाल्या आहेत.मुलींना ज्युदो कराटेचे प्रशिक्षण देणे काळाची गरज असून कळवण नगरपंचायतने प्रशिक्षण देण्यास पुढाकार घेतला ही कौतुकास्पद बाब आहे. पोलिसांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी कितीही उपाययोजना आखल्या तरी पोलीस बळ अपुरे पडत आहे. त्यामुळे मुलींनी स्वत:च्या रक्षणासाठी सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे.
- प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनी
 
महिनाभर प्रशिक्षण वर्ग
मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कराटेसारख्या खेळाची कौशल्ये आत्मसात केल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढून वेळप्रसंगी त्या वाईट प्रसंगांना खंबीरपणे तोंड देऊ शकतात. त्यामुळेच कळवण नगरपंचायतीने शहरातील विद्यार्थीनिंसाठी तब्बल महीनाभर ज्युदो- कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. सुनीतापगार, नगराध्यक्षा , कळवण
 
बातम्या आणखी आहेत...