आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदेशांद्वारे ‘स्वच्छता मोहीम’ सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कचरामुक्त नाशिकसाठी सुरू झालेल्या ‘एसएमएस’ योजनेला प्रतिसाद मिळत असून, चार दिवसांत रस्त्यावरील कचर्‍यासंदर्भात 137 तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या. याशिवाय, कचराकुंडीमुक्त नाशिकसाठी राबविण्यात आलेल्या विशेष योजनेनेही जोर धरल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

‘स्वच्छ आणि सुंदर नाशिक’ संकल्पनेला तिलांजली देत शहरातील असंख्य सार्वजनिक स्थळांवर मोठय़ा प्रमाणात कचरा पडलेला असल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी होते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’नेही ‘ब्लॅक स्पॉट’ या छायाचित्र मालिकेद्वारे शहरातील कचराबाधित क्षेत्रांचा आढावा घेतला. याची दखल घेत महापौर अँड. यतिन वाघ यांनी कचराकुंडीमुक्त नाशिक आणि एसएमएस या दोन योजना जाहीर केल्या. ‘कचराकुंडीमुक्त नाशिक’ ही योजना प्रायोगिक तत्त्वावर प्रभाग क्रमांक 13, 18, 30, 39, 40, 53 व 59 या सात प्रभागांत क्लीन-अप संस्थेच्या माध्यमातून राबविली जात आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 40 प्रभागांची 80 टक्क्यांपर्यंत स्वच्छता झाली आहे.

‘एसएमएस’ची मात्रा लागू
एसएमएसची योजना रविवार(दि. 2)पासून सुरू झाली आहे. यात ज्या भागात कचरा, झाडपाला, बांधकामाचे साहित्य (डेब्रिज) पडलेले असेल, त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता मोबाइल संचाच्या इनबॉक्समध्ये टाइप करून तो 9423179097 किंवा 9423179087 या क्रमांकांवर पाठविण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत आजवर 137 नागरिकांनी एसएमएस केले आहेत. त्यातील 52 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त 47 तक्रारींमध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात न आल्याने संबंधितांच्या तक्रारींचे निरसन करता आलेले नाही. यासंदर्भात प्रशासन आणि संबंधित यंत्रणेत सहभागी असलेल्या घटकांची बैठक येत्या शनिवारी महापालिकेच्या मुख्यालयात होणार आहे.


20 प्रलंबित असलेल्या तक्रारी
47 असंबंध माहितीच्या तक्रारी
52 निराकरण झालेल्या तक्रारी
147 आजवर प्राप्त तक्रारी
137 नागरिकांचा उपक्रमास प्रतिसाद