आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष भक्ष्यकारांकडे काणाडोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात अनेक भागात सर्रासपणे वृक्षतोडीचे प्रकार घडूनही त्यासंदर्भात महापालिका अधिकार्‍यांकडून केवळ संबंधितांना नोटीस बजावण्याचा फार्स करून वृक्षतोडणार्‍यांना मोकळे सोडले जात आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधीही याकामी मागे नसल्याचे काही घटनांवरुन दिसून आले आहे.

पर्यावरणाचा र्‍हास होऊ नये, यासाठी शासनस्तरावर उपाययोजना होत असताना शहरात मात्र वृक्षतोडीच्या घटना सुरुच आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरातील काठेगल्लीतील त्रिकोणी गार्डन, इंदिरानगरमधील राजसारथी, अंबड पोलिस स्टेशनजवळ, डीजीपीनगर, एमराल्ड पार्क, अंबडलिंकरोडवरील त्रिमूर्ती चौक अशा विविध ठिकाणी वृक्षतोड झाल्याच्या तक्रारी महापालिकेला मिळाल्या आहेत. मात्र, यासंदर्भात महापालिकेने संबंधितांना केवळ नोटीस देण्यापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. अनेकांनी तर महापालिकेने दिलेल्या नोटिसला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे पर्यावरणाविषयी महापालिका किती जागृत आहे ही बाब सुध्दा पुढे आली आहे. महापालिकेतील नगरसेवकच वृक्षतोड करून पर्यावरणावर घाला घालणार असतील तर सामान्य नागरिकांबाबत, तर बोलणेच नको. मागील महिन्यात महापालिकेतील कॉँग्रेसचे गटनेते लक्ष्मण जायभावे यांनी वृक्षतोड केल्याप्रकरणी सिडको विभागीय कार्यालयाने नोटीस दिली. त्यानंतर डीजीपीनगरमध्ये नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्या पतीनेच वृक्षतोड केल्याची तक्रार तेथील स्थानिक नागरिकांनी महापालिकेसह अंबड पोलिस ठाण्यात केली. तर आमदार हेमंत टकले यांच्या एमराल्ड पार्कमध्येच व्यवस्थापनाने दोन वृक्षांवर कुर्‍हाड चालवल्याची घटना घडली. याबाबत महापालिकेच्या अधिकार्‍यांनीही दुर्लक्ष करीत केवळ नोटिस बजावण्याचा फार्स उभा करून वृक्षतोड करणार्‍यांना एकप्रकारे पाठीशी घालण्याचाच प्रकार चालविला आहे.
गुन्हा दाखल का करायचा - वृक्षतोडीविषयी संबंधितांवर दंडात्मक कारवाई बरोबरच गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही का केली जात नाही, अशी माहिती विभागीय अधिकारी वाघ यांना विचारली असता ते म्हणाले की, संबंधितांनी घटना कबूल केल्यानंतर गुन्हा का दाखल करायचा. एक ते पाच हजारापर्यंत दंड करून कारवाई केली जात असल्याचे सांगत आयुक्तांना अहवाल सादर केल्यानंतर ते पुढील कारवाई करतात असे सांगितले.
नगरसेवकाच्या मुलाने तोडले झाड - नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांना दिलेल्या नोटिसला उत्तर देताना आपल्या मुलाने झाड तोडल्याचा खुलासा सिडको विभागीय कार्यालयास केल्याची माहिती विभागीय अधिकारी अनिल वाघ यांनी दिली. वृक्षतोडीबाबत त्याला काहीच कल्पना नव्हती, असेही जायभावे यांनी खुलाशात म्हटले आहे.
नोटीस दिली आहे - एमराल्ड पार्क येथील वृक्षतोडीसंदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम वृक्ष निरीक्षकांचे आहे. एक वृक्ष तोडल्यास त्याबदल्यात दहा वृक्ष लागवड करण्याबाबत सांगितले जाते. जयर्शी सोनवणे, पश्चिम विभागीय अधिकारी