आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tree Cutting Permission For Road Development In Nashik

रस्त्यांचा मार्ग माेकळा, वृक्ष ताेडण्यास परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रस्त्यात येणार्‍या वृक्षांचे पुनर्राेपण, तसेच ताेडण्यात येणार्‍या वृक्षांच्या बदल्यात वृक्षाराेपण केल्यानंतरच रस्त्यातील वृक्ष ताेडण्यात यावेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणातील वृक्षांचा अडथळा लवकरच दूर हाेणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा पाच फूट अंतरात येणारी किंवा दुभाजक म्हणून काम करणारी झाडे ताेडण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट आदेशही न्यायालयाने दिले. तसेच महापालिकेने तातडीने वृक्षगणना करावी, अशी सूचनाही केली.

कुंभमेळ्यासाठी ४०० काेटी खर्च करून शहरात रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. या ८६ िकलाेमीटरच्या रस्त्यांसाठी पालिकेने मध्यंतरी २६०९ वृक्ष तोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. हा निर्णय घेताना पर्यावरणप्रेमींना विश्वासातच घेण्यात आले नाही. शिवाय, यातील किती वृक्ष वाचविता येऊ शकतात, याचाही प्रशासनाने विचार केलेला नाही. परिणामत: वृक्षप्रेमींच्या नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या स्थगितीमुळे शहरातील रस्त्यांच्या बाजूची झाडे ताेडण्यास सुमारे दीड ते दाेन वर्षांपासून मज्जाव आहे. या दरम्यानच्या काळात सिंहस्थाच्या कामांनी जाेर धरला. त्यात रिंगराेडला प्राधान्य देण्यात आले. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण केल्यास वाहतुकीचा खाेळंबा हाेणार नाही, या उद्देशाने प्रशासनाने कामे सुरू केलीत. मात्र, रस्त्यात येणारी झाडे नागरिकांसाठी धाेकेदायक ठरू लागलीत. या रस्त्यांची कामे सुरूच असून, अद्याप पथदीप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ही झाडे दिसतच नाही. परिणामत: रस्त्यात येणार्‍या झाडांवर आदळून राेजच असंख्य लहान-माेठे अपघात हाेत आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली असून, अटी-शर्तींच्या अधीन राहून रस्त्यात येणारी बहुसंख्य झाडे काढण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे.

एकाच्या बदल्यात पाच वृक्ष... : रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणारे वृक्ष हटविण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्ष हटविण्याची नोटीस प्रसिद्ध करावी लागते. तसेच, एक वृक्ष तोडल्यास त्या बदल्यात पाच वृक्ष लावणेही सक्तीचे करण्यात आले आहे.

या रस्त्यांना वृक्षांचा अडथळा....
- तिडके काॅलनी ते गाेविंदनगर - मुंबईनाका ते सीबीएसमार्गे अशाेकस्तंभ - जेहान सर्कल ते बारदान फाटा - कलानगर ते पाथर्डी गाव - पेठराेड ते राऊ हाॅटेल चाैक - आैरंगाबादराेड ते लक्ष्मीनारायण पूल - आैरंगाबादराेड ते टाकळी एसटीपी (सायखेडाराेड) - नांदूरनाका ते हाॅटेल जत्रा - मेरी, दिंडाेरीराेड ते मखमलाबादराेड - कॅनाॅलराेड जंक्शन ते विजय-ममता थिएटर - पपया नर्सरी ते गरवारे पाॅइंट

रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणार्‍या वृक्षांबाबत ‘दिव्य मराठी’ने 9 फेब्रुवारी राेजी ‘सहभागातून समस्यापूर्ती या मालिकेद्वारे उपाययाेजना सुचविल्या हाेत्या.
आदेशातील महत्त्वाच्या बाबी...
- साईनाथराेड जंक्शन, कलानगर ते पाथर्डी गाव यादरम्यान येणारी काेणतीही झाडे ताेडण्यास सक्त मनाई.
- पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव ते वडनेरगेटच्या दरम्यानच्या रस्त्यात येणारी काेणतीही झाडे ताेडण्यात येऊ नयेत.
- वड, पिंपळ आणि जांभूळ या जातीची काेणतीही झाडे ताेडण्यात येऊ नयेत.
- काेणतेही झाड ताेडण्यापूर्वी महापालिकेने प्रत्याराेपण आणि पुनर्राेपणाबाबतचे प्रतिज्ञापत्रक तज्ज्ञांच्या समितीला सादर करणे आवश्यक आहे.
- पुनर्राेपण आणि वृक्षाराेपणाचा अहवाल सादर केल्यानंतरच रस्त्यांवरील झाडे ताेडावीत.
- भारतीय प्रजातींचेच वृक्ष लावावेत.
- पालिकेने वृक्ष संवर्धनासंदर्भात पाच वर्षांचा दीर्घकालीन करार करणे गरजेचे आहे. मुख्यवनसंरक्षक त्याकडे लक्ष देतील.
- झाडे कापताना पर्यावरणाला धाेका पाेहचणार नाही याची काळजी घ्यावी. कमीत कमी झाडे ताेडण्यात यावीत.
- रुंदीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान रस्त्याच्या मध्यभागी असलेली आणि पदपथांवर असलेली झाडे ताेडण्यात येऊ नयेत.
- रस्त्याच्या दुतर्फा पाच फूट अंतरात येणारी किंवा दुभाजक म्हणून काम करणारी झाडे ताेडण्यात येऊ नये.
- मुख्य वनसंरक्षकांच्या नियंत्रणाखाली काेणतेही कामकाज करण्यात येईल.
- पालिकेने वृक्ष गणना करणे आवश्यक आहे.