आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धरा तू नट हिरवाईने’ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षलागवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुणराजा तुझा थाट बहरती
कण-कण स्वागत करती नृत्याने
काळी आई सुख पावती
धरा तू नट हिरवाईने..
असं म्हणत असंख्य वृक्षप्रेमींनी डोंगररांगेवर हिरवाईचा पदर लपेटण्यासाठी कुठे बीज रोपण केले, तर कुठे अंकुरलेल्या बीजाला नवस्थान देत आभाळाकडे झेपण्यासाठी साज चढविला. निमित्त होते धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षलागवडीचा.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदश्रनाखाली वनसंवर्धन दिनानिमित्त पांडवलेणी, विल्होळी डोंगर परिसरात सुमारे 500 वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 1200 वृक्षांची लागवड करून त्या संपूर्ण वृक्षांचे संवर्धनही करण्यात येत आहे.
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यात वनसंवर्धन हा महत्त्वाचा उपक्रम असून, या निमित्त पर्यावरण संवर्धन करतानाच नागरिकांनाही त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. प्रतिष्ठानच्या सेवेकर्‍यांबरोबरच या उपक्रमात अनेक नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी होतात हेच या उपक्रमाचे यश आहे.
शिस्तबद्ध नियोजन अन् एकीचं बळ
500 वृक्षांची लागवड डोंगरावर करायची. म्हणजे एवढी रोपे डोंगरावर न्यायची. त्यासाठी सामंजस्य आणि एकी किती महत्त्वाची असते याचं दश्रन या वृक्ष लागवड उपक्रमात दिसलं. सामाजिक कामाच्या उद्देशाने नि:स्वार्थी भावनेने 300 सेवेकर्‍यांनी एकत्र येत भर पावसात मानवी साखळी तयार केली. प्रत्येक सेवेकर्‍याने एकमेकाकडे वृक्ष देत डोंगरावर पोहोचविले. झाडे केवळ लावली जात नाहीत, तर त्यांची देखभाल करण्याचे कामही प्रतिष्ठान करीत असते. यामुळे या डोंगरावर पुन्हा हिरवळ दिसू लागली आहे. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत व कौतुक केले आहे.

या वृक्षांची लागवड
नव्याने लागवड करण्यात आलेल्या आवळा, कांचन, करंज, शिरस, सीताफळ, जांभूळ, आंबा, वड, बेरडा, चिंच आदी वृक्षांची वनपरिक्षेत्र अधिकारी राजन गायकवाड यांच्या हस्ते लागवड करण्यात आली. या वेळी श्रीकांत शेळके, अभय पिंगळे, एम. एस. गोसावी, यू. बी. पाटील, राजू इनामदार यांच्यासह प्रतिष्ठानचे 300 सेवेकरी उपस्थित होते.