आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Trees Cutting At Maharashtra Engineer Training Center

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिसतच नाही की डोळेझाक; मेरीत वृक्षांची कत्तल सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाकावर टिच्चून वृक्षतोड सुरूच
मेरीच्या (महाराष्ट्र अभियंता प्रशिक्षण केंद्र) हायड्रो कार्यालयाच्या परिसरातील वृक्षांची मेरी आणि महापालिका अधिकार्‍यांच्या नाकावर टिच्चून वृक्षतोड केली जात आहे. तसेच वृक्षप्रेमी आणि सामाजिक संस्थांनी याबाबत मौन बाळगळ्याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘दिव्य मराठी’त मेरी वसाहतीतील वृक्षतोडीसंदर्भात वृत्त प्रसारित झाल्यावर अधिकार्‍यांनी अधिक तपास केला असता मेरीच्याच कर्मचार्‍यांनी झाडे तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. वृक्षतोड केलेल्या कर्मचार्‍यांनी रातोरात सरपण लंपास केले आहे. तोडलेले सरपण कुठे गेले याची चौकशी अधिकार्‍यांनी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. परिसरातील नागरिकांनी सहकार्य करीत वृक्षतोड करणार्‍यांनी लाकडे ही इमारतीच्या गच्चीवर ठेवली असल्याचे कळविले. यामधून केवळ एकाच कर्मचार्‍यानी शासनाच्या परवानगीने वृक्षतोड केली असून, त्याचा पुरावाही दाखविला आहे. मेरीच्या अधिकार्‍यांनी याबाबत पंचवटी पोलिस ठाण्याला वारंवार पत्रव्यवहार केला असूनही हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांचे या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे.


मायको सर्कलजवळ जाळपोळ करून वृक्षतोड
मायको सर्कलजवळील पाटबंधारे कार्यालयाच्या पाठीमागील भागात अज्ञात व्यक्तींनी वृक्ष जाळून त्यांची कत्तल केली. या भागात सुमारे 10 ते 12 वृक्षांची तोड करण्यात आली असून, या भागातील वृक्षतोडीच्या प्रकाराकडे महापालिका अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.

केंद्र व राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून वृक्षरोपणासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च करण्यात येतो. मात्र, मेरी-मायको सर्कल आणि महापालिका क्षेत्रातील वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून त्याकडे मात्र, अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याचे समोर येत आहे. राज्य शासनाने 2013-14 या वर्षासाठी नाशिक विभागात साडेतीन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, जे वृक्ष आहेत त्यांची तोड थांबविण्यासाठी शासन कोणतेही पाऊल उचलत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मायको सर्कलच्या समोरच वन विभागाचे विभागीय कार्यालय आहे. समोर वृक्षतोड होत असूनही या अधिकार्‍यांवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.

वृक्षाचा लाभ सर्वांनाच
वृक्ष महापालिका हद्दीत येत असले तरी सावली मात्र ते सर्वांनाच देतात. वृक्षांचा फायदा सर्वांनाच होतो मग तो महापालिका हद्दीत असू देत, नाहीतर वनविभागाच्या हद्दीत असू दे.
- नीलेश ठाकूर, वृक्षप्रेमी

वनविभागाचा याच्याशी संबंध नाही
वनविभागाचा नागरी क्षेत्राशी काहीच संबंध नसतो. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील वृक्षतोडीबद्दल आम्हाला काहीच करता येत नाही.
-अरविंद पाटील, उपवनसंरक्षक पश्चिम नाशिक