नाशिकरोड - साधी अन् सोपी आदिवासी वारली चित्रकला भारताचे वैभव असून, कलाप्रेमींनी ही कला आत्मसात करावी, असे प्रतिपादन चार्टर्ड अकाउंटंट मुकुंद कोकीळ यांनी केले.
ऋतुरंग परिवारातर्फे ऋतुरंग भवनात चित्रकार सुप्रिया जोशी यांच्या वारली चित्रशैली प्रदर्शनाचे आणि वारली चित्रसृष्टी कार्यशाळेचे आयोजन केले होते. ऋतुरंगने चित्रप्रदर्शन व कार्यशाळा आयोजित करून कलेचे समृद्ध दालन छोट्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना उपलब्ध करून दिल्याचे कोकीळ यांनी सांगितले. चार दिवस चाललेल्या प्रदर्शनाला शहरातील असंख्य कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुप्रिया जोशी यांनी विविध प्रसंगांची वारली शैलीतील चित्रे रेखाटली. तसेच, दोन दिवसांच्या वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. 75 वर्षांपर्यंतच्या कलाप्रेमींनी सहभाग नोंदविला. कला समीक्षक संजय देवधर यांनी मार्गदर्शन करताना वारली चित्रकलेचा अकराशे वर्षांचा इतिहास, कलेतील योगदान, सद्यस्थिती याबद्दल माहिती देऊन चित्र, प्रात्यक्षिके सादर केली.
कार्यशाळेचा समारोप मुकुंद कोकीळ यांच्या हस्ते झाला. प्रास्ताविक राजा पत्की यांनी, तर शिबिरार्थींच्या वतीने अर्चना भार्गवे, अरुण पाटील, मोन पारपियानी, मुकुंद बळेल यांनी मनोगत व्यक्त केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ऋतुरंग परिवाराचे विजय संकलेचा, हेमंत शुक्ल, संजय माळी, प्रकाश पाटील, संतोष जोशी, वसंत घोडके, विवेक जोशी, नंदकुमार खाडे आदींनी पर्शिम घेतले.