आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयद्वारी... खुनातील संशयितांवर हल्ल्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- खून प्रकरणात पकडलेल्या संशयितांचे चेहरे पाहण्यासाठी मृताच्या नातेवाइकांनी सोमवारी (दि. ८) न्यायालयातच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी २५-३० महिलांसह तरुणांनी संशयितांच्या चेहऱ्यावरील काळा कपडा फाडण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या आवारात बराच वेळ हा गोंधळ सुरू असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर सरकारवाडा पोलिसांचा अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पंचवटी परिसरातील संदीप कुमावत या रिक्षाचालकाचा शनिवारी भावबंधन मंगल कार्यालय परिसरात खून झाला होता. त्यातील पाच संशयितांना पंचवटी पोलिसांनी २४ तासांत अटक केली. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे आधीपासूनच मृताच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. पंचवटी पोलिस ठाण्याचे पथक संशयितांना न्यायालयात घेऊन आल्यानंतर महिलांनी एकाच वेळी हल्ला केला. या झटापटीत दोन संशयितांच्या अंगावरील कपडे फाटले. न्यायालयात बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना जमाव जुमानत नसल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी संशयितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्य केंद्रात आश्रयासाठी लपवले. तेथून पोलिस बंदाेबस्तात न्यायालयाच्या अँटी चेंबरमध्ये ठेवण्यात आले.
न्यायालयाने पाचही संशयितांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस कोठडीचा आदेश सुनावला गेल्यानंतर सुरक्षितता म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संशयितांना पोलिस वाहनातून नेण्यात आले. संतप्त महिलांची पोलिसांनी समजूत काढल्याने तणाव निवळला.
आधीही झाले हल्ले
न्यायालयाच्याआवारात संशयितांवर हल्ले होण्याचे प्रकार नवीन नाहीत. टिप्पर गँगच्या संशयितांनी तर पाेलिसांवरच हल्ला केला होता. बलात्कार प्रकरणातील संशयितावर काळी शाई फेकण्याचा प्रयत्न झाला होता.