आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - व्ही. शांताराम यांनी 76 वर्षांपूर्वी ‘संत तुकाराम’ हा चित्रपट पडद्यावर आणला होता. 1936 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर मात्र तुकारामांच्या आयुष्यावर काहीही निर्मिती झाली नाही. मी जेव्हा या माणूसपण जागवणा-या महान संताच्या आयुष्यावर चित्रपट काढायचे ठरवले तेव्हा मनात एक धागा पक्का होता की, केवळ जुना काळ उभा करण्यापेक्षा पिरियड सिनेमा म्हणून तो काळ सजवण्यापेक्षा त्या काळातील कालसापेक्ष असे घटक, चिरंतन राहिलेले संस्कार आणि आधुनिक युगातल्या म्हणवणा-यांनी तुकारामांचा लावलेला अन्वयार्थदेखील चित्रपटात दाखवायचा. आधुनिक पिढीसमोर संत तुकाराम उभे करताना ते केवळ अभंगांपुरते मला नको होते. या चित्रपटाचे गमकच ‘मेकिंग ऑफ तुकाराम’ या थीममध्ये आहे. 1609 ते 1650 हा कालावधी उभा करताना नऊ वर्षांचा तुकाराम आणि संत तुकाराम यांची जडणघडण कशी होते हेदेखील या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे. कारण तुकारामांची जडणघडण आजच्या मुलांसमोर, त्यांच्या पालकांसमोर पोहोचणे आवश्यक आहे. तुकारामांची शिकवण, त्यांनी अंधश्रद्धेवर केलेले भाष्य, रचलेले अभंग, त्यांचा विद्रोह, त्यांची भक्ती, त्यांचे माणूस असणे, त्यांनी वेठबिगारीवर त्या वेळी केलेले प्रतीकात्मक काम हे सगळे दोन तास चाळीस मिनिटांच्या अवधीत मला दाखवायचे होते. हा 42 वर्षांचा कालखंड प्रत्यक्षात उभारताना मला तुकारामांचा घडण्याचा प्रवास जितका महत्त्वाचा वाटला तितकाच तत्कालीन सामाजिक परिस्थितीत त्यांनी वठवलेली भूमिकादेखील महत्त्वाची वाटली. कारण थोड्याफार फरकाने आपण आजही त्याच समस्यांशी
झगडत आहोत.
या चित्रपटासाठी मला टेलिफोनच्या तारा नसलेले, प्लास्टिकच्या बाटल्या नसलेले, कुठलाही आधुनिकतेचा स्पर्श न झालेले गाव हवे होते. भारत विकासाच्या गप्पा मारत असताना मी सडक नसलेले, दळणवळणाच्या सुविधा नसलेल्या गावाची अपेक्षा करणे तर हास्यास्पदच होते. त्यामुळे असे गाव शोधताना खूप कष्ट पडले.
अभंगांइतकाच अभंग
नदीचा असाच जुन्या काळातला घाट शोधला तेव्हा त्या घाटावर नुकताच पूर येऊन गेला होता. त्यामुळे तेथील झाडांवर प्लास्टिकसारख्या वस्तू अडकून पडल्या होत्या. अशा अनेक भौगोलिक व आधुनिक घटकांच्या बाबतीत आम्ही संघर्ष करीत जुना, 1600 च्या काळातला तुकारामपट उलगडवीत गेलो. तुकारामांचा अभ्यास करताना मला जितका अपार आनंद होत होता तितकेच समाधान याचे होते की, आपण एका अशा संतावर चित्रपट बनवीत आहोत, जो त्याच्या अभंगांइतकाच ‘अभंग’ आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. जितेंद जोशीची भूमिका यामध्ये उल्लेखनीय आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.