आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्ये मागतात डाळ, नाफेड म्हणते तूर घ्या; तूरीच्‍या वांध्याने नाफेडच्या तोंडाला फेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांमधील शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केलेल्या १ लाख ९५ हजार ४६३ मेट्रिक टन तुरीची विक्री करण्याचे आव्हान नाफेडसमोर निर्माण झाले आहे. या तुरीच्या विक्रीसाठी नाफेडने देशातील सर्व राज्यांकडे विचारणा केली असता, आम्हाला तूर नाही, डाळ लागते असे राज्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आतापर्यंत फक्त कर्नाटकने रेशनद्वारे पुरवठा करण्यासाठी नाफेडकडे तूरडाळीची मागणी नोंदविली आहे.
 
चालू वर्षात देशात तुरीचे विक्रमी पीक आल्याने खुल्या बाजारातील भाव ५०५० रुपये क्विंटल या हमीभावापेक्षा ३ हजार क्विंटलपर्यंत खाली घसरले होते. त्यानंतर नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने तूर खरेदी केली. तुरीच्या विक्रीसाठी नाफेडने देशातील सर्व राज्यांशी संपर्क साधला, परंतु फक्त कर्नाटक वगळता एकाही राज्याने त्यांच्याकडील तूर खरेदीबाबत उत्सुकता दाखविली नाही. आम्हाला तूर नाही, तूरडाळ लागते अशी उत्तरे राज्यांनी नाफेडला दिली आहेत. राज्यांनी किंवा संबंधित यंत्रणांनी मागणी नोंदविल्यावर, त्याची डाळ दळून देण्याचीही नाफेडची तयारी आहे. कर्नाटकाने रेशनद्वारे डाळ वितरित करण्यासाठी नाफेडकडे तुरीची मागणी नोंदविली आहे. त्याची डाळ काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात ती कर्नाटक सरकारच्या सुपूर्द करण्यात येणार आहे. परंतु, नाफेडने केलेल्या एकूण खरेदीत कर्नाटकच्या मागणीचा वाटा खूपच कमी असल्याने, उर्वरित तूरीची विक्री करण्याचे नाफेडपुढील आव्हान कायम आहे.

मिलिटरी कँटीन, पोषण आहारासाठी मागणीची अपेक्षा
नाफेडने महाराष्ट्रातून १ लाख १५ हजार २७६ मेट्रिक टन, गुजरातमधून ४९ हजार ७९७ मेट्रिक टन आणि कर्नाटकातून ३०,३९० मेट्रिक टन अशी १ लाख ९५ हजार मेट्रिक टन तूर खरेदी केली. या तुरीच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बालकाच्या पोषण आहारासाठी महिला व बालविकास खाते व सैन्य दलाच्या कँटीन्सकडून नाफेडला मागणीची अपेक्षा आहे.