नाशिक - मूत्रपिंडाच्या दुर्धर आजाराने पीडित तुषार कासारची व्यथा ‘दिव्य मराठी’ने मांडली अन् बघता बघता तब्बल पाच लाखांचा निधी तुषारच्या वडिलांच्या बँक खात्यात मदतरूपाने जमा झाला. या रकमेतून लवकरच तुषारवर अहमदाबाद येथील इन्स्टिट्यूट आॅफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर येथे अवघड शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेऊन तुषार व त्याचे कुटुंब अहमदाबादकडे रवाना झाले. ‘दिव्य मराठी’मुळेच तुषारचा पुनर्जन्म झाल्याच्या भावना त्याच्या आईने व्यक्त केली.
जन्मत:च मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासलेल्या तुषारवर यापूर्वी सात वेळा शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी त्याची आई ललिता व वडील किरण यांनी घरही विकलं; पण तुषार पूर्ण बरा झालाच नाही. अखेर डॉक्टरांनी त्याची माहिती इंटरनेटवर अपलोड केली. त्याला प्रतिसाद देत अहमदाबादच्या ‘इन्स्टिट्यूट आॅफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर’ने तुषारच्या उपचाराचे आव्हान स्वीकारले. तसेच बिलापैकी फक्त 25 टक्के रक्कम घेण्याचा निर्णय घेतला, तरीही शस्त्रक्रियेसाठी 4 लाख 50 हजार रुपयांचा खर्च लागणार असल्याने तुषारचे आई-वडील हतबल झाले होते.
याची दखल घेत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध करून मदत करण्याचे आवाहन केले. त्यासाठी बँकेचा खाते क्रमांक प्रसिद्ध केला. तेव्हापासून तुषारच्या उपचारासाठी त्याच्या वडिलांच्या खात्यात सुमारे पाच लाख रुपये दानशूरांनी जमा केले आहेत.