आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेस्टाइल पाठलाग करत दोन सोनसाखळी चोर जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात तीन ठिकाणी सोनसाखळी चोरी करणाऱ्या श्रीरामपूर येथील दोन संशयितांना पाथर्डी फाटा परिसरात सिनेस्टाइल पाठलाग करून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. ऑन दि स्पॉट संशयित जेरबंद होण्याची ही पहिलीच घटना असून, संशयितांकडून सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन तासांच्या अंतरामध्ये पंडित कॉलनी, हिरावाडी आणि धोंडगेनगर येथे तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. कारवाईचा थरार उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितला. या कारवाईचा हा लाइव्ह रिपोर्ट...

वेळ सकाळी १० वाजेची. पहिली घटना पंडित कॉलनी. दुसरी घटना हिरावाडी, वेळ ११.३० आणि तिसरी घटना धोंडगेनगर, वेळ दुपारी १२ वाजेची अशा सुमारे दोन तासांच्या अंतरात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या. या घटनांची बिनतारी संदेशाद्वारे पोलिस आयुक्तालयात माहिती देण्यात आली. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे पाथर्डी फाटा परिसरात नाका बंदी कारवाईमध्ये होते. एका दुचाकीवर दोन जण भरधाव वेगात येत असल्याचे संदेश झेंडे यांना प्राप्त झाले. तत्काळ झेंडे यांनी पाथर्डी फाटा परिसरातील अश्विननगर परिसरात नाकेबंदी कारवाई करत असलेले वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डीकर यांना कळवले. याच दरम्यान डीबी पथकाचे उपनिरीक्षक इंगोले हेदेखील संशयितांचा पाठलाग करत होते. अखेर संशयितांना अरुंद गल्लीमध्ये दोन्ही बाजूने घेरत जेरबंद केले.

चोरटे श्रीरामपूरचे...
चौकशीमध्ये इलियाज इराणी (३५) मुस्लिम खान (२८, दोघेही रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) अशी नावे असल्याचे त्यांनी सांगितले. हे चोर श्रीरामपूर येथील असून, चोरी केल्यानंतर श्रीरामपूरकडे पसार होण्याचा त्यांचा प्रयत्न होता. फरार झालेल्या दोन संशयितांच्या मागावर एक पथक रवाना झाले आहे. अवघ्या दोन तासांत पोलिसांना हे सांघिक यश प्राप्त झाले. शहरात प्रथमच अशाप्रकारे सोनसाखळी चोरांना ऑन दी स्पॉट जेरबंद करण्यात आल्याचे पोलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. या थरारक कारवाईमध्ये सहभागी सर्व पोलिस अधिकारी, आिण कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी अभिनंदन केले आहे.

चोरी गेलेली सोनसाखळी महिलेस परत
संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार चार जण दोन दुचाकीवरून अाले. प्रथम शहरात आणि नाशिकरोड परिसरात सोनसाखळी चोरी करून पाथर्डी फाटामार्गे वडनेर गेट आणि पुढे नाशिक-पुणा रोडमार्गे श्रीरामपूरकडे ते जाणार असल्याचे संशयितांनी सांगितले. सोनसाखळी संशयितांच्या अंगझडतीमध्ये दोन सोनसाखळ्या, अंगठी आणि एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. यातील एका महिलेस चोरी गेलेली सोनसाखळी तत्काळ पोलिसांनी परत केली. पोलिसांनी समन्वय साधत तत्काळ केलेल्या कारवाईने दोन सोनसाखळी चोर हाती लागल्याने या कारवाईबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दोन पथके रवाना
नाकेबंदी केल्याने संशयितांना पकडणे शक्य झाले. दोन संशयित फरार झाले. त्यांची नावे समजली आहेत. दोन पथके त्यांच्या मागावर आहेत. त्यांनाही अटक करण्यात येईल. मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. श्रीकांत धिवरे, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ