आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन महिन्यांच्या जुळ्यांचे मातृत्वासह पितृत्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुलांना लहान असतानाच आई वडिलांचा खरा आधार आणि ममतेची गरज असते. आई वडिलांचे बोट धरलेले असताना जगातील कोणतीही दृष्ट शक्ती आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही, हा विश्वास लहानग्यांमध्ये असतो. त्या विश्वासातूनच चेहऱ्यावर येते निरागस हसू. रविवारी साजऱ्या झालेल्या ‘फादर्स डे’ निमित्त आपल्या लहानग्यांच्या या निरागस, सात्विक हास्याचे साक्षीदार "त्या' पित्यासही होता आले. परंतु, त्यास लाभली एक दुखद किनार. आयुष्यभर भरुन येणारी एक जखम. त्यामुळे त्याला आपल्या लहानग्यांच्या केवळ पितृत्वाचीच नव्हे तर त्यांच्या आईचीही जबाबदारी पेलावी लागत आहे.
अनेक कुटुंबात रविवारी फादर्स डे उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे सिडकोतील भूषण बाळासाहेब पवार यांच्या घरी वेळगेच आव्हान उभे राहिल्याचे दिसून आले. बाजीप्रभू चौकात राहणाऱ्या भूषण पवार यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची. तीन वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातील छाईल येथील सुवर्णा शिंदे या मुलीशी त्यांचा विवाह झाला. सुवर्णानेही परिस्थितीशी जुळवून घेतले. या दांपत्यास दोन महिन्यांपूर्वी जुळे झाले. दोन्हीही मुले. बाळांच्या येण्याने भूषणच्या कुटुंबातील सर्वच जण आनंदात होते. भूषणसह त्याचे आई वडिलही सुवर्णाची अधिकच काळजी घेऊ लागले. सध्या असलेल्या या कमाईत जुळ्या मुलांची जबाबदारी व्यवस्थित सांभाळता येणार नाही याची जाणीव असलेल्या भूषणने मग खासगी कंपनीतील रात्रपाळी झाल्यानंतर सकाळी परिसरात दुधाच्या पिशव्या पोहचविण्याचे काम स्वीकारले. सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना हृदयाशी संबंधित आजाराने सुवर्णाचा १२ जून रोजी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. काळाच्या या घाल्याने पवार कुटुंबीयांची स्वप्ने उदध्वस्त झाली. क्षणात होत्याचे नव्हते झाले. मुलांना आईच्या दुधाची जेव्हा आत्यंतिक गरज असते. तेव्हाच आई दुरावल्याने अवघ्या दोन महिन्यांच्या जुळ्यांना आईचे दुध बंद झाले. आईच्या मायेचे छत्र हरपल्याने आता या बाळांचे पुढे काय..हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहिला. अशा वेळी पित्याच्या भूमिकेत असलेल्या भूषणने आईच्या ममतेचे छत्र बाळांवर धरले. हळूहळू बाळांना वरचे दूध देण्यास सुरुवात केली. नकळत्या वयात आईच्या प्रेमापासून पारखे झालेल्या बाळांचे बाळपण संपेपर्यंत अशा परिस्थितीत सांभाळ करणे हे एक आव्हानच आहे. एका पित्याचे खरे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न भूषणकडून होत असून त्याच्या या प्रयत्नांना अनेकांनी दाद दिली आहे.

त्यांच्यासाठी आता प्रत्येक दिवस फादर्स डे
‘फादर्सडे’ कधी येतो हे गावीही नसणारा भूषण रविवारच्या ‘फादर्स डे’ची चर्चा एेकून मात्र हळवा झाला. मुले मोठी झाल्यावर या दिवशी वडिलांच्या प्रेमाची जाणीव ठेवून त्यांना कोणी भेटवस्तू देतात. भूषणच्या घरी मात्र पिता म्हणून तोच बाळांना हवे तेवढे प्रेम देत असून प्रत्येक दिवस त्याच्या दृष्टीने फादर्स डेच असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...