आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार-कंटेनर अपघातात दोन साईभक्तांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणा-या अहमदाबादच्या भाविकांची भरधाव कार पुढे जाणा-या कंटेनरखाली शिरून झालेल्या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर मिरगाव फाट्याजवळ गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अजय भालचंद्र पंचाल (वय ४९), मीलन चैतन्यप्रसाद पांचोली (५०) अशी मृतांची नावे असून, आशुतोष महेशभाई जोशी (५३) आणि जिग्नेश देवीप्रसाद चौधरी (४०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अहमदाबाद येथून महिंद्रा कारने (जीजे ०१, आरजी ८६८१) चौघे जण शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. सिन्नर- शिर्डी मार्गावर अंधारामुळे पुढे जात असलेल्या कंटेनरचा (एमएच ०४, ईएल २६७९) अंदाज न आल्याने भरधाव वेगातील कार पाठीमागून कंटेनरखाली शिरली. या भीषण अपघातात कारमध्ये पुढे बसलेल्या दोघांवर काळाने झडप घातली, तर पाठीमागच्या सीटवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. वावी पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक हेमंत पाटील, हवालदार एस. के. माळी, आर. एम. धुमाळ, रवी बारहाते, बी. डी. महाले, अतुल फलके यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारांसाठी सिन्नर येथे हलवले. वावीचे किरण पाटील यांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनरखाली शिरलेली कार बाजूला करून मृतदेह बाहेर काढले.

शुक्रवारी (दि. १९) सकाळी सिन्नर येथील नगरपालिका दवाखान्यात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. जखमींनाही पुढील उपचारांसाठी अहमदाबाद येथे हलवण्यात आले आहे. वावी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. माळी तपास करीत आहेत.