आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पार्टीप्रकरण: देशमुखांसह दोघांची ‘एसीबी’ चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक विमानतळावर झालेल्या पार्टीप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्यासह एका कार्यकारी अभियंत्याच्या मालमत्तेची उघड गोपनीय चौकशी करण्याच्या हालचाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) सुरू झाल्या आहेत. मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडेंच्या तक्रारीची दखल घेत महासंचालक प्रवीणकुमार दीक्षित यांनी नाशिकच्या अधीक्षकांकडे ही तक्रार वर्ग करीत त्याची पडताळणी करण्याचे आदेश दिले.

सेवानिवृत्ती वाढदिवसाचे निमित्त साधून देशमुख यांच्यासाठी विमानतळाच्या बांधकामाचे ठेकेदार विलास बिरारी यांनी आयोजित केलेल्या या साग्रसंगीत पार्टीच्या वेगवगेळ्या चर्चा रंगत आहेत. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिका-यांना त्याच्या चौकशीचे आदेश दिले. पाठोपाठ देशमुख कार्यकारी अभियंता आर.टी. पाटील यांनी बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्याची तक्रार मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी एसीबीकडे इ-मेलद्वारे केली होती. यासंदर्भात,महासंचालक दीक्षित यांना तक्रार अर्ज प्राप्त झाला असून पुढील चाैकशीसाठी नाशिकचे अधीक्षक प्रवीण पवार यांच्याकडे तो वर्ग करण्यात आल्याचे उत्तर इ-मेलद्वारे कोंबडे यांना कळविण्यात आले.

दीक्षितयांच्याकडून दुजोरा: दरम्यान,महासंचालक प्रवीणकुमार दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोंबडे यांच्याकडून फेब्रुवारीला तक्रार प्राप्त झाली होती. ती नाशिकच्या अधीक्षकांकडे वर्ग करून त्यांना तक्रारीची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या तपासात काही निष्पन्न झाल्यास पुढील चौकशी केली जाईल.

प्रकरण दडपण्यासाठी स्पर्धा
ओझर विमानतळावरील ओल्या पार्टीचे आयोजन करणा-या ठेकेदाराला मदत करणा-या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिका-यांवर ‘सांभाळून’ घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळेच खात्यातील दोन्ही महत्त्वाच्या पदांचा प्रभार सांभाळणा-या अधिका-यांची तोंडेही दोन िदशेला गेल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, हे अधिकारी आता राज्य शासनाच्या विशेष चौकशी पथकाबाबत आपण पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे सांगत असून, एकूणच त्यांची भूमिका आपल्याच पूर्वसुरी वा सहका-यांच्या कृत्यावर पांघरूण घालण्याजोगी असल्याचा संशय निर्माण झाला अाहे.

सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या निवृत्तीनिमित्त झालेल्या या पार्टीच्या आयोजनामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यातील तीन अधिका-यांचा संबंध असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. प्रशासकीय शिस्त माेडणे सार्वजनिक शांततेचा भंग आदी कारणांमुळे तिघांवरही निलंबनाची टांगती तलवार अाहे. दरम्यान, बुधवारी अधिका-यांना निलंबित केल्याचे आदेश बांधकाम खात्याला पाठवले गेल्याची चर्चा होती. त्याचा माग घेण्यासाठी मुख्य अभियंता माने यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईत असल्यामुळे उपलब्ध झाले नाहीत. त्यांच्यापाठाेपाठ अधीक्षक अभियंतापदाचा अधिभार असलेले, मूळ मालेगाव येथील कार्यकारी अभियंतापदी काम करणा-या उकिरडे यांनी माहिती देण्यास साफ नकार िदला. मी मालेगावमध्ये असल्यामुळे नाशिकमध्ये काय चालले अाहे हे सांगता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. या प्रकरणी मुंबईतून अालेल्या विशेष पथकाबाबत आपणास माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहिती विचारल्यावर त्यांनी सायंकाळचे वाजले असताना बैठका सुरू असल्याचे कारण देत भ्रमणध्वनी खंडित केला. एकूणच प्रकार बघता त्यात गुंतलेल्या वरिष्ठ अधिका-यांना वाचवण्याची केविलवाणी धडपडही लपून राहिलेली नाही.

ऐनवेळी सांगितले नियोजन
निवृत्तीनिमित्तकार्यालयातच अधिकारी कर्मचा-यांच्या वतीने निरोप समारंभ झाला. त्यावेळी मला ओझर विमानतळावर स्नेह भोजनाचे आयोजित केल्याचे सांगण्यात आले. मी कुटुंबीयांसमवेत बाहेर जेवणासाठी जाणार होतो. सहका-यांच्या आग्रहामुळे पार्टीत गेलो. आई, पत्नी, कन्या, पुतणी, तीन बहिणीही साेबत हाेत्या. तेथे वाद्यवृंद होता. पण, आक्षेपार्ह बाबी नव्हत्या. पी.वाय. देशमुख, निवृत्त मुख्य अभियंता

या अटींचे उल्लंघन
*कुठलाहीकायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास पोलिसांना तत्काळ कळविणे आवश्यक आहे. पण, त्यांना कळविण्यातच आले नाही.
*स्वच्छता राखणे आवश्यक असून, तेथेच सर्वत्र अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले.
ठेकेदाराविरुद्ध दुसरा गुन्हा
विमानतळावरीलपार्टीप्रकरणी दाखल गुन्हा आणि जिल्हाधिका-यांनी उगारलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या बडग्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागानेही पार्टीचे आयोजक, ठेकेदार विलास बिरारी यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईलाही आयोजकांना सामोरे जावे लागेल.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या निवृत्तीची पार्टी ३१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानेही क्लब हाऊसचा परवानाएका दिवसासाठी दिला होता. त्यासाठीच्या अटींचे उल्लंघन झाल्याबद्दल बिरारींविरुद्ध हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे स्वरूप विभागीय गुन्हा असल्याची माहिती अधीक्षक आवळे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास प्रभारी निरीक्षक देशमुख करीत असून, त्यांच्याकडून माहिती येताच त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिका-यांना सादर करण्यात येईल. जिल्हाधिकारी त्यावरून त्यांचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो मुख्यमंत्र्यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनाही देतील.