आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत बदलाचे संकेत; महानगरप्रमुखपदी पुन्हा अजय बोरस्ते यांची निवड शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी जवळपास दोन वर्षांपासून रिक्त असलेले महानगरप्रमुखपद भरले जाणार आहे. महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांच्यावर पुन्हा महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच, महिला शहर संघटकपदही अँड. श्यामला दीक्षित तर जिल्हा संघटकपदी हेमंत गोडसे यांच्या नावावर एकमत असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, याबाबत औपचारिक घोषणा केवळ बाकी आहे.

लोकसभेसाठी उमेदवार निवडीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर निवडक पदाधिकार्‍यांबरोबरील चर्चेत संघटनात्मक बांधणीचा ठाकरे यांनी आढावा घेतला. नाशिक महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतर सेनेची शहर कार्यकारिणी बरखास्त झाली. तेव्हापासून महानगरप्रमुखपद रिक्त आहे. त्यातच महानगरप्रमुखपद रद्द करून सहा उपमहानगरप्रमुख नेमण्याची संकल्पना पुढे आली. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी जुन्याच पद्धतीवर आधारित महानगरप्रमुखाच्या नेतृत्वाखालील संघटना विस्ताराला चालना देण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. महानगरप्रमुखपदासाठी तीन नावे समोर असली तरी यापूर्वी महानगरप्रमुख म्हणून कामाचा अनुभव असलेल्या बोरस्तेंवर जबाबदारी देण्याचे संकेतही त्यांनी दिले. दरम्यान, शोभा मगर राष्ट्रवादीत गेल्याने शिवसेनेचे महिला शहर संघटकपद रिक्त आहे. येथेही दोन महिलांची नावे सुचवली असून, त्यातून एक नाव दोन दिवसांत निश्चित होईल, असे एका पदाधिकार्‍याने सांगितले.

नववर्षात दिंडे ‘मातोश्री’वर : धुळ्याचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या बढतीमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नाराजी कायम आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी जयंत दिंडे यांनी बैठकीला हजेरी लावली; मात्र व्यस्त दौर्‍यामुळे ठाकरे यांच्याशी दिंडे यांची चर्चा होऊ शकली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल कदम, दादा भुसे व धनराज महाले या तिघांनी ठाकरे यांच्याशी चर्चा करून दिंडे यांच्याकडे दिंडोरी मतदारसंघाची जबाबदारी देण्याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. त्याप्रमाणे पुढील आठवड्यात अर्थातच नवीन वर्षात ‘मातोश्री’वरून चर्चेसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

प्रचाराची धुरा तिघांवर
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार कोण हे ठाकरे ठरवणार आहेत; मात्र संभाव्य चेहरे असलेले हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर व आमदार बबनराव घोलप या तिघांवर प्रचाराची धुरा सोपवल्याचे वृत्त आहे. संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांनी मतदारसंघात फिरून पक्षबांधणी करावी व त्यासाठी गोडसे यांच्याकडेही स्वतंत्र पदाची जबाबदारी देण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.